आशियाई क्रिकेट मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. सुपर 4 फेरीत अव्वल राहिलेले भारत आणि श्रीलंका हे संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी दोन हात करतील. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या पाच गोलंदाजांची आपण माहिती घेऊया.
आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये साखळी फेरी व सुपर 4 असे मिळून 12 सामने खेळले गेले. त्यानंतर अंतिम सामन्याच्या आधी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आपला दबदबा राखला. श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याने आपल्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजी शैलीने 5 सामन्यात 11 बळी मिळवले आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनोमी रेट 6.41 असा राहिला. तर, दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचाच युवा फिरकीपटू दुनिथ वेललागे दिसून येतो. त्याने स्पर्धेत आत्तापर्यंत पाच सामने खेळताना 5 पेक्षा कमीच्या सरासरीने दहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी हा देखील 10 बळींसह उभा आहे. तर चौथ्या व पाचव्या क्रमांकावर भारताचा कुलदीप यादव व बांगलादेशचा तस्किन अहमद प्रत्येकी नऊ बळींसह दिसून येतात.
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात पथिराना, वेललागे व कुलदीप यांच्यामध्ये सर्वाधिक बळी मिळवण्यासाठी चढाओढ असेल. एकूण स्पर्धेचा विचार केल्यास भारतीय संघ आपल्या आठव्या आशिया चषक विजेतेपदासाठी प्रयत्न करेल. तर, श्रीलंका सातव्यांदा आशिया चषक उंचावून भारताची बरोबरी करण्याचा आत्मविश्वास बाळगून आहे.
(Asia Cup 2023 Patheerana And Wellalage Tops Most Wickets Chart)
हेही वाचा-
भन्नाट, जबरदस्त! 2023 मध्ये ‘असा’ विक्रम फक्त टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ गिललाच जमला, नजर टाकाच
पदार्पणवीराने दोनच चेंडूत केला रोहितचा खेळ खल्लास; सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही माझी Dream Wicket…’