आगामी आशिया कपला 9 सप्टेंबर सुरुवात होत. आहे. ज्यासाठी टीम इंडिया नूकतीच दुबईला पोहचली आहे. दरम्यान महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आगामी आशिया कपसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गावस्कर यांच्या मते, संजू सॅमसनला भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये संधी नक्की द्यावी. त्यांनी सुचवले की सॅमसनला शुबमन गिल आणि अभिषेक शर्मानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवता येईल.
गावस्कर म्हणाले, “जर तुम्ही संजू सॅमसनसारख्या खेळाडूला 15 जणांच्या संघात घेतलं, तर त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवणं योग्य नाही. तो तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकतो आणि गरज पडल्यास सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिकाही निभावू शकतो.”
त्यांनी मान्य केलं की सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यात निवड करणं निवड समितीसाठी अवघड ठरणार आहे. कारण जितेशलाही आयपीएलमध्ये चांगला अनुभव आहे आणि तो फिनिशरच्या भूमिकेत यशस्वी ठरला आहे. गावस्कर म्हणाले, “हे निवड समितीसाठी सुखद डोकेदुखी आहे.”
भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे. गावस्कर यांच्या मते, सॅमसनला किमान पहिल्या काही सामन्यांत तरी संधी मिळेल आणि पुढे त्याची फॉर्म कशी राहते त्यावर निर्णय होईल.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव नेहमी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर खेळतात. त्यामुळे गावस्करांनी सूचित केले की तिलकला पाचवा किंवा सहावा क्रमांक दिला जाऊ शकतो, कारण हार्दिक पांड्याही त्या जागेसाठी तयार असतो.
टीम इंडिया आशिया कपमध्ये 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय संघ त्यानंतर लीगमधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानशी सामना करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.






