आशिया कप 2025 हॉकी स्पर्धेत सुपर-4 फेरीला सुरुवात झाली असून, या फेरीत भारताने कोरियाविरुद्धचा पहिला सामना रोमांचक ड्रॉमध्ये संपवला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गोल केले आणि सामना 2-2 अशा बरोबरीत संपला. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या या लढतीनंतरही भारताला अजूनही फायनल गाठण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
सामन्याच्या सुरुवातीला हार्दिक सिंहने भारतासाठी पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. परंतु लगेचच जुगराज सिंहच्या चुकीमुळे कोरियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यांनी त्याला गोलमध्ये परिवर्तित करून सामना 1-1 ने बरोबरीत आणला. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कोरियाने आणखी एक गोल करत आघाडी घेतली.
शेवटच्या क्षणी मनदीपचा गोल
सामन्याच्या अखेरच्या क्वार्टरमध्ये मनदीप सिंहने अप्रतिम गोल करत भारताला पुन्हा बरोबरीत आणले. त्यानंतर काही काळ भारताच्या विजयाची आशा निर्माण झाली होती, पण कोरियाच्या बचावफळीने चांगला खेळ करत आणखी कोणताही गोल होऊ दिला नाही.
भारतीय संघ अजूनही अपराजित
भारतीय संघाने यापूर्वी पूल ए मधील सर्व सामने जिंकत सुपर-4 मध्ये प्रवेश केला होता. चीनला 4-3, जपानला 3-2 तर कझाकस्तानला तब्बल 15-0 अशा फरकाने हरवून संघाने आपली ताकद दाखवली होती. सुपर-4 मध्ये आता प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असून, पहिल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
भारताचा पुढील सामना आज 4 सप्टेंबरला मलेशियाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे






