सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय मिळवत सुपर-4 पॉइंट्स टेबलमध्ये आपलं खाते उघडलं. मात्र भारताला पहिल्या स्थानावरून खाली खेचण्यात त्यांना यश आलं नाही. श्रीलंकेवर मिळालेल्या या विजयामुळे पाकिस्तानवरचं ‘कलंक’चं टॅग मात्र निघून गेलं. तर श्रीलंका सलग दोन सामने हरल्यामुळे आता चौथ्या स्थानावर घसरलं आहे.
भारत आणि पाकिस्तानकडे समान 2-2 गुण आहेत, पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया +0.689 नेट रन रेटमुळे पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान +0.226 नेट रन रेटमुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने देखील एक सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत, मात्र त्यांचा नेट रन रेट +0.121 असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
आशिया कप 2025 सुपर-4 पॉइंट्स टेबल
| संघ | सामने | विजय | पराभव | टाय | नो रिजल्ट | गुण | नेट रन रेट |
|---|---|---|---|---|---|---|---|
| भारत | 1 | 1 | 0 | 0 | 0 | 2 | +0.689 |
| पाकिस्तान | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 2 | +0.226 |
| बांगलादेश | 1 | 1 | 0 | 0 | 0 | 2 | +0.121 |
| श्रीलंका | 2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | -0.590 |
टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीस बोलावणाऱ्या श्रीलंकेने फारशी चांगली कामगिरी केली नाही. 58 धावांवरच त्यांचे अर्धे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. कमिंदू मेंडिसने खेळलेली अर्धशतकी खेळी (50) मुळेच श्रीलंका 133 धावांपर्यंत पोहोचली, अन्यथा संघ शंभरच्या आतच गडगडला असता. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदीने धारदार मारा करत 3 गडी बाद केले, तर अबरार अहमदने 4 षटकांत फक्त 8 धावा देत 1 विकेट घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने सुरुवातीला जलद गतीने धावा केल्या, पण 45 वर पहिला गडी गमावल्यापासून संघ डळमळला. 57 धावांवरच 4 विकेट गमावले आणि 80 वर पाचवा गडी बाद झाला. सामना रोमांचक वळणावर गेला असतानाच मोहम्मद नवाज (38) आणि हुसेन तलत (32) यांनी नाबाद खेळी करत पाकिस्तानला 2 षटके बाकी असताना 5 गडी राखून विजय मिळवून दिला.






