ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे.
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपला प्रवास थांबवत फुटबॉल क्लब कारकिर्दीची नवी सुरवात केली आहे.
मंगळवारी (१७ जुलै) ख्रिस्तियानो रोनाल्डोची जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत ख्रिस्तियानो रोनाल्डाने जगप्रसिद्ध मेस्सी-रोनाल्डो वादावर पडदा टाकत, मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो या प्रश्नाला उत्तर दिले.
“प्रत्येक फुटबॉलपटू त्याच्या क्लबसाठी लढत आहे. इथे सर्वच फुटबॉलपटू सर्वोत्तम आहेत. मात्र मी श्रेष्ठ की मेस्सी हे आमच्या फुटबॉल कारकिर्दीला पूर्णविराम लागल्यानंतर कळेल. तसेच मी कोणत्याही फुटबॉलपटूला माझा स्पर्धक म्हणुन पाहत नाही. कोणत्याही फुटबॉलपटूशी स्पर्धा करण्यात मला रसही नाही आणि माझ्या जगण्याची पद्धतही नाही.” जुवेंटस फुटबॉल क्लबशी करार केल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डो म्हणाला.
अर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तूगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हे सध्याच्या काळात जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांबरोबरच फुटबॉल विश्वात मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हा वाद सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या-