---Advertisement---

भारतीय दिग्गजाच्या मुलाची पदार्पणातच शानदार खेळी, अवघ्या 26 षटकांत जिंकवला सामना

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2024 4:14 PM
Virender-Sehwag
---Advertisement---

भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंची मुलं आता क्रिकेटपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड महाराजा टी20 ट्रॉफी मध्ये शानदार फलंदाजी करून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता या यादीत आणखी एका दिग्गज खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. या खेळाडूच्या मुलानं विनू मांकड ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना शानदार खेळी केली.

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग यानं अंडर-19 स्तरावर आयोजित विनू मांकड ट्रॉफीमध्ये शुक्रवारी दिल्लीकडून पदार्पण केलं. या सामन्यात 16 वर्षीय आर्यवीरनं सलामीवीर म्हणून 64 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेनं हुकलं. आर्यवीरनं वडिलांच्या शैलीत स्फोटक फटके मारत 49 धावांच्या खेळीत एकूण 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात आर्यवीर 21व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 49 धावा करून बाद झाला. आर्यवीर व्यतिरिक्त दिल्लीचा कर्णधार प्रणव पंतन शानदार फलंदाजी करत एकूण 75 धावा केल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला मणिपूरचा संघ 49.1 षटकात अवघ्या 169 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, दिल्लीनं हे सोपे लक्ष्य 26 षटकांत केवळ 2 गडी गमावून गाठलं. गोलंदाजीत दिल्लीकडून लक्ष्मणनं सर्वाधिक 3 तर दिवंश आणि अमननं प्रत्येकी 2 बळी घेतले.

विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड होण्यापूर्वीच आर्यवीरनं आपली कमाल दाखवली होती. दिल्ली क्रिकेट असोसिएशन द्वारे आयोजित चाचणी सामन्यात त्यानं 136 चेंडूत 183 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यापूर्वी, आर्यवीरची 2022 मध्ये दिल्ली अंडर-19 संघासाठी (विजय मर्चंट ट्रॉफी) संभाव्य खेळाडू म्हणून निवड झाली होती. सध्या सुरू असलेल्या विनू मांकड ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं तर, पॉइंट टेबलमध्ये डी ग्रुपमध्ये दिल्ली सध्या पहिल्या स्थानावर आहे.

हेही वाचा – 

सामना ड्रॉ होऊनही मुंबईनं जिंकली इराणी ट्रॉफी! कसं काय जाणून घ्या
ind vs ban; पहिल्याच सामन्यात मयंक यादवसह हे 3 खेळाडू भारतासाठी पदार्पण करण्याची शक्यता
टी20 विश्वचषक भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कोणासोबत मुकाबला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---