बीसीसीआयने (BCCI) यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वरुण चक्रवर्ती आणि नितीश कुमार रेड्डी हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. वरुणच्या जागी विप्राज निगमला संधी देण्यात आली असून, भारतीय संघात त्याची ही पहिलीच निवड आहे. परिणामी, आता भारतीय संघ 14 खेळाडूंसह आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल.
नितीश कुमार रेड्डी याची सुरुवातीला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघासाठी निवड झाली होती. मात्र, आता त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. फिटनेसच्या कारणास्तव हार्दिक पांड्याला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने नितीशला ही संधी मिळाली. त्यामुळे त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून माघार घ्यावी लागली.
16 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने एकाच वेळी चार वेगवेगळ्या स्पर्धांसाठी संघांची घोषणा केली. वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका, इराणी चषक आणि 2026ची आशियाई क्रीडा स्पर्धा. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा संघ यापूर्वीच जाहीर झाला होता, परंतु आता त्यात हे अलीकडील बदल करण्यात आले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली. साइड स्ट्रेनच्या (पोटाच्या स्नायूंची दुखापत) समस्येमुळे तो अफगाणिस्तान मालिका आणि 2026ची आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्हीमधून बाहेर पडला, ज्यामुळे विपराज निगमचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. याव्यतिरिक्त, इराणी चषकासाठी रेस्ट ऑफ इंडिया (Rest of India) संघाची घोषणा करण्यात आली असून, रिषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरफराज खानचाही या संघात समावेश आहे. हा सामना ‘रेस्ट ऑफ इंडिया’ आणि रणजी ट्राॅफी विजेते जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जाईल.
एशियन गेम्स 2026 साठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वैभव सूर्यवंशी, यश ठाकूर, विप्राज निगम.






