पुणे । पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रुती अहलावत हिने, तर मुलांच्या गटात दक्ष अगरवाल या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकीत दक्ष अगरवाल याने मानस धामणेचा 6-4,6-2 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
हा सामना 1तास 15मिनिटे चालला. सामन्यात 13वर्षीय दक्षने पहिल्या सेटमध्ये सुरेख सुरुवात करत मानसची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दक्षने पहिल्याच गेममध्ये मानसची सर्व्हिस भेदली.
या सेटमध्ये दक्षने वर्चस्व राखत तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दक्ष हा विजडम शाळेत नववी इयत्तेत शिकत असून फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक संग्राम चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
त्याचे हे सहावे विजेतेपद आहे . यावेळी दक्ष म्हणाला की, मी सामन्यात सुरूवातीपासुनच वर्चस्व राखले. 5-1 अशी आघाडी घेतल्यानंतर मानसने रॅली करण्यास सुरूवात केली. सामन्यावर नियंत्रण राखत मी पहिला सेट जिंकला. मानस तुलनेने कमी उंच असल्याने मी फायदा घेत खेळात बदल केले व सामना जिंकला.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित श्रुती अहलावट हिने चौथ्या मानांकित वेदा प्रापुर्नाचा 6-0,6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 15मिनिटे चालला. श्रुती हि द मौर्या स्कुलमध्ये सातवी इयत्तेत शिकत असून गुडगाव येथे ब्लिस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक सौरभ शर्मा व विबोर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्याला 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूस 200 एटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अपर्णा वाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार वाकणकर, स्पर्धा संचालक कौस्तुभ शहा, वैशाली शेकटकर आणि संयोजन सचिव प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 14 वर्षाखालील मुले:
दक्ष अगरवाल(भारत)(5)वि.वि.मानस धामणे(भारत)6-4,6-2
14 वर्षाखालील मुली:
श्रुती अहलावट(भारत)(3)वि.वि.वेदा प्रापुर्ना(भारत)(4)6-0,6-3