कोलकता : गतविजेत्या एटीेकेने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी नॉर्थईस्ट युनायटेडला एकमेव गोलने हरविले. प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी पेलणारा मार्की खेळाडू रॉबी किन याने पुर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. चौथ्या मोसमात तळाचे स्थान टाळण्यासाठी एटीकेला हा सामना महत्त्वाचा होता. पराभूत नॉर्थईस्टचे शेवटचे दहावे स्थान कायम राहिले. या लढतीबरोबरच यंदाच्या साखळी टप्याची सांगता झाली.
अखेरच्या सामन्यापूर्वी एटीकेचे हंगामी प्रशिक्षक अॅश्ली वेस्टवूड यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे रॉबीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्याने ती यशस्वीरित्या पेलली. एटीकेने 18 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून चार बरोबरी व दहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. त्यांचे नववे स्थान कायम राहिले. नॉर्थईस्टला 18 सामन्यांत 13वा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण व तळातील स्थान कायम राहिले.
दहाव्या मिनिटाला कॉन्नर थॉमसने नेटच्या दिशेने लांबून चेंडू मारल्यानंतर रॉबीने छान टायमिंग साधत धाव घेतली. त्याने प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवित चेंडू नेटमध्ये मारला. त्यानंतर त्याने नेहमीच्या शैलीत जल्लोष केला.
14व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. मालेमनगाम्बा मैतेई याने पेनल्टी क्षेत्रातील जॉन मॉस्क्युएरा याला सुंदर पास दिला. जॉनने चेंडू नेटमध्ये मारला, पण तोच ऑफसाईडचा इशारा झाला.पुर्वार्धात नॉर्थईस्टने काही चांगले प्रयत्न केले. 23व्या मिनिटाला हालीचरण नर्झारीने मारलेला फटका एटीकेच्य जॉर्डी माँटेलने थोपविला. चेंडू बाहेर गेल्यामुळे नॉर्थईस्टला कॉर्नर मिळाला. त्यावर मैतेईने मारलेला चेंडू एटीकेचा गोलरक्षक सोराम पोईरेई याने अडविला. 27व्या मिनिटाला रिगन सिंगने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने आधी मारलेला फटका अडविला गेला. रिबाऊंडवर संधी मिळाल्यानंतरही हेच घडले.
36व्या मिनिटाला सर्वोत्तम संधी वाया गेली. हेलीओ पिंटो याने एटीकेच्या अन्वर अली याच्या पासवर ताबा मिळविला. त्याने जॉनकडे चेंडू सोपविला. जॉनने मार्करला चकविले. त्यानंतर त्याच्यासमोर नॉर्थईस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश हाच होता. त्याने डाव्या पायाने चेंडू मारला, पण टायमिंगअभावी पोईरेईला चेंडू अडविता आला.
निकाल :
एटीके : 1 (रॉबी किन 10) विजयी विरुद्ध
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : 0