गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी दुसऱ्या सामन्यात एटीके मोहन बागान संघाने केरला ब्लास्टर्सवर दोन गोलांच्या पिछाडीवरून 3-2 असा झुंजार विजय मिळविला. याबरोबरच एटीकेएमबीने दुसरे स्थान भक्कम करण्यासाठी तीन बहुमोल गुण मिळविले. पेनल्टीसह दोन गोल करणारा फिजीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याचे दोन गोल आणि ओदिशा एफसीकडून लोनवर घेतलेला मार्सेलिनीयो याचा एक गोल यामुळे एटीकेएमबीने हा सामना जिंकला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. ब्लास्टर्सचे खाते आघाडी फळीतील ब्रिटनचा 33 वर्षीय खेळाडू गॅरी हुपर याने उघडले. दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बचाव फळीतील झिंबाब्वेचा 35 वर्षीय खेळाडू कोस्टा न्हामोईनेस्कू याने 51व्या मिनिटाला ब्लास्टर्सची आघाडी भक्कम केली, मात्र त्यानंतर आठ मिनिटांत आघाडी फळीतील ब्राझीलचा 33 वर्षीय खेळाडू मार्सेलिनीयो याने एटीकेएमबीचे खाते उघडले. मग सहा मिनिटांनी फिजीचा 33 वर्षीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने एटीकेएमबीला बरोबरी साधून दिली. तीन मिनिटे बाकी असताना ब्लास्टर्सच्या ढिसाळ बचावामुळे कृष्णाने विजयी गोल केला.
एटीकेएमबीचा हा 14 सामन्यांतील आठवा विजय असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. मुंबई सिटी एफसी 14 सामन्यांतून 30 गुणांसह आघाडीवर आहे. हैदराबाद एफसी 15 सामन्यांतून 22 गुणांसह तिसऱ्या, तर एफसी गोवा 14 सामन्यांतून 21 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. एटीकेएमबीने तिसऱ्या क्रमांकावरील हैदराबादवर पाच गुणांची आघाडी घेतली आहे. याशिवाय एटीकेएमबीचा एक सामना बाकी आहे.
ब्लास्टर्सला 14 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण व नववे स्थान कायम राहिले.
ब्लास्टर्सने आक्रमक प्रारंभ केला. 14व्या मिनिटाला बचावपटू संदीप सिंग याने उडवीकडून विरुद्ध दिशेला चेंडू मारला. त्यावेळी हुपरने छातीने चेंडू नियंत्रीत करीत दमदार फटका मारला. त्यावेळी एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला कोणतीही संधी मिळाली नाही. चेंडूच्या दिशेने डावीकडे झेप घेऊनही त्याला फटका अडविता आला नाही.
मध्यंतरास ब्लास्टर्सने एका गोलची आघाडी राखली. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही त्यांनी आक्रमक प्रारंभ केला. 51व्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने घेतला. त्याने मारलेल्या चेंडूला मध्यरक्षक के. पी. राहुल याने हेडरद्वारे कोस्टाकडे सोपविले. कोस्टाचा हेडिंगवरील प्रयत्न अरींदमने रोखला, पण चेंडू समोरच पडल्यामुळे कोस्टाला पुन्हा संधी मिळाली आणि यावेळी त्याने अचूकता साधत फिनिशींग केले.
एटीकेएमबीने प्रतिआक्रमण रचले. यात बदली स्ट्रायकर मानवीर सिंग याने पुढाकार घेतला. त्याने उजवीकडून ब्लास्टर्सच्या बॉक्समध्ये चेंडू मारला, जो आपल्या दिशेने येताच मार्सेलिनीयोने पुढे धावत येणारा ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याला चकविले.
त्यानंतर 63व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा कर्णधार व बचावपटू जेसील कार्नेरीओ याची चेंडूवरील ताब्यासाठी मानवीरसह चुरस झाली. त्यावेळी कार्नेरीओ याचा हात चेंडूला लागला. हे लक्षात येताच रेफरी एल. अजितकुमार मैतेई यांनी एटीकेेएमबीला पेनल्टी बहाल केली. कृष्णाने याचे गोलमध्ये रुपांतर केले. त्याचा ताकदवान फटका दिशेचा अंदाज बरोबर येऊनही गोम्सला रोखता आला नाही.
बरोबरीनंतर एटीकेएमबीने प्रयत्न कायम ठेवले. तीन मिनिटे बाकी असताना कृष्णाने बदली मध्यरक्षक प्रोणय हलदर याच्या पासवर गोल केला. त्यावेळी ब्लास्टर्सचा बदली मध्यरक्षक प्रशांत करुथादाथ्कुनी याला चेंडू रोखता आला नाही. याशिवाय कृष्णाच्याच जवळ असलेला बचावपटू संदीप सिंगही ही चाल रोखू शकला नाही.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडचा मुंबई सिटीला पुन्हा धक्का
आयएसएल २०२०-२१ : नाट्यमय लढतीत गोवा-ईस्ट बंगाल बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : हैदराबादची अखेरच्या पाच मिनिटांत बेंगळुरूविरुद्ध बरोबरी