गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) गुरुवारच्या (२४ फेब्रुवारी) सामन्यात सातव्या क्रमांकावरील ओदिशा एफसीला हरवून अव्वल चार संघांतील स्थान मजबूत करताना ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चितीचे लक्ष्य एटीके मोहन बागानने ठेवले आहे.
टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहन बागानचे पारडे जड आहे. १६ सामन्यांतून ३० गुण खात्यात असलेल्या एटीकेने आणखी एक विजय मिळवल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश आणखी सुकर होईल. केरला ब्लास्टर्स एफसीविरुद्ध २-२ असे बरोबरीत समाधान मानावे लागल्याने मोहन बागानची सलग तीन विजयांची मालिका संपुष्टात आली. मात्र, अपराजित सामन्यांची मालिका १२वर गेली आहे. मागील लढतीत एका गुणावर समाधानावर मानावे लागले तरी सध्याचा फॉर्म पाहता मोहन बागानला विजयाची सर्वाधिक संधी आहे.
एटीकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रत्येक खेळाडूने योगदान दिले आहे. केरलाविरुद्ध जॉनी कौकाने बरोबरीचा गोल लगावला. त्याने आयएसएलच्या आठव्या हंगामात दोन गोल करताना पाच गोल करण्यात (असिस्ट) मदत केली आहे. एटीकेसाठी कौका याने ह्युगो बॉमोससह सर्वाधिक गोल असिस्ट करण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थान राखले आहे. मोहन बागानने ३३ गोल करताना २४ गोल खाल्लेत.
फॉर्मात असलेल्या मोहन बागानला प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीचीही समस्या भेडसावत आहे. आमचे परदेशी फुटबॉलपटू शंभर टक्के फिट नाहीत. मात्र, दुखापतीतून सावरत आहेत. मात्र, दुखापतीतील सुधारणा आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे मोहन बागानचे प्रशिक्षक फेरँडो यांनी म्हटले आहे. गुरुवारच्या लढतीसाठी आमचा वेगळा प्लान नसेल. अमुक एका खेळाडूपेक्षा प्रतिस्पर्ध्यांवर सर्वच आघाड्यांवर वर्चस्व राखण्याला आम्ही प्राधान्य देऊ, असे त्यांनी पुढे सांगितले.
मागील सामन्यात बंगलोर एफसीकडून १-२ असा पराभव झाल्याने सातव्या स्थानी असलेल्या ओदिशा एफसीचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास संपुष्टात आले आहे. १८ सामन्यांतून २२ गुण मिळवलेल्या या क्लबसमोर गमावण्यासारखे काहीही नाही. मात्र, शेवटच्या दोन सामन्यांत खेळ उंचावून बाद फेरीची गणिते बिघडवण्याची त्यांना संधी आहे.
पॉइंट्स टेबल पाहता तिसऱ्या स्थानावरील एटीके मोहन बागानचे पारडे जड असले तरी आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात ओदिशा एफसीने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यामुळे तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी असला तरी अपराजित मालिका कायम राखताना एटीकेचा कस लागेल.
महत्वाच्या बातम्या-
- ‘मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो, पण आमच्याकडे पंत…’, इशानचे रिषभबरोबरील स्पर्धेबाबत मोठे भाष्य
- आयपीएल २०२२ मधील तब्बल ७० सामने होणार मुंबई अन् पुण्यात? ‘या’ ४ स्टेडियमवर आयोजनाची शक्यता
- कार्लसनला पराभूत केल्यानंतर १६ वर्षीय प्रज्ञानानंदचे होतंय कौतुक; सचिन, विश्वनाथन यांच्याकडूनही शाबासकी