गोवा: सातव्या हिरो इंडियन सुपर लिग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारी वांबोळी येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बागान यांच्यातील लढतीने प्रारंभ होत आहे.
निष्ठावान चाहत्यांचा पाठिंबा, चुरशीच्या लढतींचा इतिहास, स्टार खेळाडूंचा भरणा आणि धुर्त प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असे समान दुवे असलेले संघ आमनेसामने येतील. त्यामुळे या लढतीने लिगला जोरदार प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.
सुमारे आठ महिन्यांच्या खंडानंतर भारतात सुरु होत असलेली ही पहिली मोठी क्रीडा स्पर्धा असेल. सलामीच्या लढतीत हे दोन संघ आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या दोन लढतींमधील विजयामुळे दोन वेळचा उपविजेता ब्लास्टर्स तिसऱ्या वेळीही बाजी मारणार का याची उत्सुकता आहे.
या दोन संघांतील मागील लढतीपासून बरेच काही बदलले आहे. ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एल्को शात्तोरी यांच्याकडून किबू व्हिकुना यांच्याकडे सुत्रे आली आहेत. त्यामुळे ब्लास्टर्सच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड असेल. गेल्या मोसमात व्हिकूना यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानने आय-लीग विजेतेपद पटकावले. या संघाने आक्रमक शैलीचा खेळ प्रदर्शित केला. आता आधीच्या क्लबविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
स्पेनच्या व्हिकुना यांनी सांगितले की, बागानविषयी माझ्या भावना नेहमीच चांगल्या असतील. मी एक मोसम त्यांच्याकडे होतो आणि त्यांनी मला चांगली वागणूक दिली. संचालक मंडळात माझे बरेच मित्र आहेत, पण आता मी ब्लास्टर्समध्ये येऊन आनंदात आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी माझे चांगले स्वागत केले. मी सर्वोत्तम कामगिरी करेन. क्लबच्या सदस्यांशी माझे चांगले संबंध आहेत. उत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असलेला चांगला संघ घडविण्याचा आमचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे गतविजेता आणि एकूण तीन वेळचा विजेता एटीके यंदाही संभाव्य विजेता असेल. अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आणखी भक्कम करण्यात आला आहे. हबास यांनी सांगितले की, व्हिकूना यांनी बागानसाठी चांगली कामगिरी बजावली, पण आयएसएल ही वेगळी स्पर्धा आहे. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, पण तीन गुण मिळविण्याचा आमचा निर्धार आहे. दररोज त्यासाठीच आम्ही कसून सराव करीत असतो.
स्पेनचे हे दोन प्रशिक्षक आमनेसामने येत आहेत. त्यांच्याकडे स्टार खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे आरोग्याच्या नव्या निर्बंधांनुसार होत असलेल्या लढतीत चाहत्यांना चुरशीच्या खेळ पाहता येईल. हे दोन्ही संघ नेहमीच दर्जेदार खेळ करतात. मोसमाचा प्रारंभ करण्यास याहून सरस लढत असू शकत नाही.