---Advertisement---

एटीकेच्या डेव्हिड विलियम्सनं सर्वात जलद गोल नोंदवला, पण हैदराबादनं सामना बरोबरीत सोडवला

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 11:39 PM
---Advertisement---

गोवा| इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) इतिहासातील सर्वात जलद गोलची नोंद आज झाली. एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विलियम्सनं १२व्या सेकंदात हा गोल करून इतिहास रचला. डेव्हिड हा गोल करूनच थांबला नाही, तर त्यानं हैदराबाद एफसीची बचावफळी खिळखिळीत केली. ६४व्या मिनिटाला आशिष रायच्या स्वयंगोलनं एटीकेला आघाडी मिळवून दिली. हैदराबादकडून बार्थोलोमेव ऑग्बेचेनं १८व्या मिनिटाला गोल केला आणि त्यानंतर दुसऱ्या गोलसाठी त्यांना ७५ मिनिटे वाट पाहावी लागली. भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला बदली खेळाडू जेव्हियर सिव्हेरिओनं हेडरद्वारे गोल केला आणि सामना २-२ असा बरोबरीत सुटला. या निकालासह हैदराबानं गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली, मोहन बागानला तिसऱ्या क्रमांकावर बढती झाली.

एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसी यांच्यातला सामना चुरशीचा होणार यात काहीच शंका नव्हती. दोन्ही संघ टॉफ फोअरमध्ये आहेत, दोघांचा विजयी धडाका कायम आहे. पण, किक ऑफपासूनच धमाका पाहायला मिळेल, याची अपेक्षा कुणालाच नव्हती. मोहन बागानच्या ह्युगो बौमोसच्या पासवर १२व्या सेंकदात डेव्हिड विलियम्सनं गोल केला आणि आयएसएलच्या इतिहासातील हा सर्वात जलद गोल ठरला. याआधी जमशेदपूर एफसीच्या जेरी मविहमिंगथांगानं २०१८च्या पर्वात केरला ब्लास्टर्सविरुद्ध २३व्या सेकंदाला गोल केला होता. तो विक्रम आज मोडला गेला. ६व्या मिनिटाला अनिकेत जाधवनं हैदराबाद एफसीला बरोबरीचा गोल करण्याची सोपी संधी गमावली. पुढच्याच मिनिटाला हैदराबादचा कॉर्नरवरून गोल करण्याचा प्रयत्न मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंगनं सुरेखरित्या अडवला. मागील ७ सामन्यांत हैदराबाद एफसी अपराजित आहेत आणि त्यांच्याकडून पलटवार होताना दिसला.

१३व्या मिनिटाला मनवीर सिंग एकट्यानं चेंडू घेत हैदराबाद एफसीच्या पेनल्टी बॉक्समध्ये शिरला, परंतु तो फायनल टच देणार तितक्यात ज्युआननं सुरेख बचाव करून मोहन बागानला आणखी एक गोल करण्यापासून रोखले. १८व्या मिनिटाला बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंगकडून चूक झाली अन् हैदराबादनं बरोबरीचा गोल केला. अनिकेत जाधवच्या क्रॉसवरून आलेला चेंडू अमरिंदरनं रोखला खरा, परंतु तो चेंडू हातात कायम राखू शकला नाही. त्याचवेळी पेनल्टी बॉक्समध्ये असलेल्या बार्थोलोमेव ऑग्बेचेनं चेंडू गोलजाळीत पाठवला. अमरिंदनं याबाबत पंचांकडे दाद मागितली, परंतु पंचांनी हा गोल मान्य केला. पुढच्याच मिनिटाला अनिकेतनं गोल करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात तो अपयशी ठरला. हैरदाबादकडून आक्रमण अधिक तीव्र होताना दिसले.

२६व्या मिनिटाला अमरिंदरकडून पुन्हा चूक झाली आणि चेंडू चुकीचा पास केला. त्याचवेळी ऑग्बेचे तेथे होता आणि सोपा गोल झाला असता, परंतु यावेळेस मोहन बागानचे नशीब बलवान ठरले. ४२व्या मिनिटाला मोहन बागानच्या कार्ल मॅकह्यू आणि ऑग्बेचे यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर मॅकह्यू जमिनिवरच पडून राहिला आणि मैदानावर अॅम्ब्यूलन्स बोलावण्यात आली. दुखापतीमुळे मॅकह्यूला मैदान सोडावे लागले. पहिल्या हाफमध्ये जवळपास एक तासाचा खेळ झाला. दोन्ही संघांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी मोहन बागानला दोन धक्के बसले. मॅकह्यूला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, तर प्रमुख खेळाडू ह्युगो बौमोसला चौथं पिवळ कार्ड मिळाल्यामुळे पुढील सामन्यात खेळता येणार नाही.

दुसऱ्या हाफमध्ये हैदराबादचे आक्रमण थंडावले, तर एटीके आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसली. ५९व्या मिनिटाला हैदराबादकडून एडू गार्सियानं गोलचा पहिला प्रयत्न केला अन् ऑन टार्गेट असलेला चेंडू अमरिंदरनं सुरेखरित्या अडवला. डेव्हिड फक्त गोल करून थांबला नाही, तर तो हैदराबादची बचावफळी खिळखिळीत करत होता. ६४व्या मिनिटाला त्याच्या पासवर जॉनी काकोनं हेडरद्वारे गोल करून मोहन बागानला २-० अशी आघाडी मिळवून दिली. रिप्लेत हा चेंडू हैदराबादच्या आशिष रायच्या पायाला लागून गोलजाळीत विसावल्याचे दिसले आणि तो स्वयंगोल दिला गेला. ७१व्या मिनिटाला पुन्हा डेव्हिडनं गोल करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु यावेळेस लिस्टन कोलाकोला गोल करता आला नाही. ८१व्या मिनिटाला अमरिंदरनं सुरेख बचाव करताना हैदराबादचा बरोबरीचा गोल अडवला. मोहन बागानकडून नंतर वेळखाऊ खेळ सुरू झाला . पाच मिनिटांच्या भरपाई वेळेत बदली खेळाडू जेव्हियर सिव्हेरिओनं हेडरद्वारे गोल केला करून हैदराबादला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली.

निकाल – एटीके मोहन बागान २ ( डेव्हिड विलियम्स १ मि., आशिष राय ६४ मि. स्वयंगोल ) बरोबरी विरूद्ध हैदराबाद एफसी २ ( बार्थोलोमेव ऑग्बेचे १८ मि., जेव्हियर सिव्हेरिओ ९०+१ मि. )

महत्त्वाच्या बातम्या-

सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह की विराटचा कव्हर ड्राईव्ह? विस्फोटक कांगारू फलंदाजाने सांगितले त्याचे आवडते शॉट

श्रीलंकेच्या झंझावाती फलंदाजाने सोडले क्रिकेट, चक्क फिटनेस टेस्टला कंटाळून घेतला निवृत्तीचा निर्णय!

मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना सीएसके करेल टार्गेट! एकावर तर असेल कर्णधार धोनीचे बारीक लक्ष

हेही पाहा-

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---