---Advertisement---

ATP Finals: थिम आणि मेदवेदेव अंतिम सामन्यात येणार आमने-सामने

---Advertisement---

लंडन। एटीपी फायनल्स 2020 चा अंतिम सामना रविवारी(22 नोव्हेंबर) ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिम विरुद्ध रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे यंदा एटीपी फायनल्स स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे. कारण याआधी थिम किंवा मेदवेदेवने एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकलेले नाही.

डॉमनिक थिम सलग दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात –

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला थिम सलग दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्याला मागच्यावर्षी अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यंदा तो हे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल.

त्याने या स्पर्धेत यावर्षी उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचचा पराभव केला आहे. 2 तास 54 मिनिटे चाललेल्या या सामन्यात थिमने 7-5, 6-7(10), 7-6(5) अशा तीन सेटमध्ये विजय मिळवला आणि अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला.

रंगतदार झालेल्या या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये थिमला 4 मॅच पाँइंट मिळाले होते. परंतु, जोकोविचने शानदार खेळ करत थिमला संघर्ष करायला भाग पाडला. जोकोविचने हे चारही मॅच पाँइंट वाचवत दुसरा सेट जिंकला आणि सामन्याची रंगत वाढवली. तिसरा सेटही टायब्रेकरमध्ये गेला होता. पण यावेळी थिमने बाजी मारली.

थिम हा सलग दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात खेळणारा गेल्या चार वर्षातील पहिलाच खेळाडू आहे.

मेदवेदने केला नदालचा पराभव –

एक वर्षापूर्वी एटीपी फायनल्समध्ये एकही विजय न मिळवू शकलेल्या डॅनिल मेदवेदेवने यंदा मात्र अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालचा 3-6, 7-6(4), 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 2 तास 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात नदालने पहिला सेट जिंकून आघाडी मिळवली होती. मात्र नंतर मेदवेदेवने शानदार पुनरागमन केले.

त्याने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये गेला. तिसरा सेट मेदवेदेवने सहज जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. हा मेदवेदेवचा सलग 9 वा विजय होता.

थिम विरुद्ध मेदवेदेव –

अंतिम सामन्यात थिम आणि मेदवेदेव आमने-सामने येणार आहेत. याआधी या दोघांमध्ये 4 सामने झाले आहेत. त्यातील 3 सामन्यात थिमने बाजी मारली आहे, तर मेदवेदेवने 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आता आज कोण बाजी मारणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

सलग 6 व्या वर्षी मिळणार वेगळा विजेता –

गेल्या 6 वर्षापासून एटीपी फायनल्सला वेगवेगळे विजेते खेळाडू मिळत आहे. यंदा या स्पर्धेला वेगळा विजेता मिळण्याचे सलग 6 वे वर्ष आहे. याआधी 2015 मध्ये जोकोविचने, 2016 मध्ये अँडी मरेने, 2017 मध्ये दिमिट्रोवने, 2018 मध्ये ऍलेक्झांडर झ्वेरेव आणि 2019 मध्ये स्टिफानोस त्सित्सिपासने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---