लंडन। स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी फायनल्स २०२० स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुरुवारी(१९ नोव्हेंबर) रात्री दिमाखात प्रवेश केला आहे. त्याने शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित आणि गतविजेत्या स्टिफानोस त्सित्सिपासचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या मानांकित नदालने ग्रीसच्या त्सित्सिपासला २ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ६-४, ४-६, ६-२ अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे २२ वर्षीय त्सित्सिपासला यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीतच बाद व्हावे लागले. त्याने मागच्यावर्षी ही स्पर्धा जिंकली होती.
नदालने या सामन्याची सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण त्सित्सिपासने लगेचच दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले. त्यामुळे हा सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये गेला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र नदालने त्सित्सिपासवर वर्चस्व ठेवत हा सेट सहज जिंकला आणि सामना खिशात घातला.
Is this the year 🇪🇸 @RafaelNadal takes the title? 🏆
He moves into the semi-finals with a 6-4, 4-6, 6-2 win over Tsitsipas! 👏#NittoATPFinals pic.twitter.com/x1V6k43uOE
— ATP Tour (@atptour) November 19, 2020
नदालने मागीलवर्षी देखील एटीपी फायनल्समध्ये त्सित्सिपासला पराभूत केले होते. मात्र नदाल त्यावेळी त्याच्या ग्रुपमधील अन्य टेनिसपटूंच्या निकालांमुळे उपांत्यफेरी गाठू शकला नव्हता.
गुरुवारचा सामना जिंकल्यानंतर नदाल म्हणाला, ‘चांगले खेळून नेहमीच छान वाटते आणि तुम्ही जेव्हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळत असता. तुम्हाला माहित असते की तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. ते आज रात्री झाले. पण मी विजयाचा मार्ग शोधू शकलो. त्यामुळे मी आनंदी आहे.’
नदाल म्हणाला, ‘हा माझ्यासाठी महत्त्वाचा सामना होता. मागीलवर्षी मी २ सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकलो नव्हतो. पण यावर्षी मी उपांत्य फेरीत पोहचलो आहे. मला हा सामना जिंकणे गरजेचे होते आणि ते मी केले. मी चांगला खेळलो.’
विशेष म्हणजे २० ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल अजून एकदाही एटीपी फायनल्सचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. त्यामुळे यावेळी तो पहिले एटीपी फायनल्सचे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. याआधी त्याने २०१० आणि २०१३ ला अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आता नदालचा उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी सामना होईल. हा सामना शनिवारी(२१ नोव्हेंबर) होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ATP Finals: स्टार टेनिसपटू जोकोविचला धूळ चारत मेदवेदेवची उपांत्य फेरीत धडक
ATP Finals – जोकोविचची धडाक्यात सुरुवात, डिएगो श्वार्टझमॅन केले पराभूत