इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे, जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी कोण खेळणार, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी (3 ऑगस्ट) जाहीर केले आहे.
पुरुष निवड समितीने बुमराहच्या जागी औकिब नबी याची निवड केली आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाला वरिष्ठ राष्ट्रीय संघात पहिल्यांदाच बोलावण्यात आले आहे. नबीने गेल्या दोन रणजी ट्रॉफी हंगामात एकूण 104 बळी (विकेट्स) घेतले आहेत; यात 2025-26 च्या हंगामातील 60 विकेट्सचा समावेश असून, त्याने जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक रणजी ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नबीने नुकतेच भारत अ संघासोबत श्रीलंकेचा दौरा केला आहे. त्यामध्ये त्याने श्रीलंका अ विरुद्ध 2 अनाधिकृत कसोटी सामन्यांमध्ये खेळताना 6 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याची मुख्य संघात निवड झाली आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्याबरोबर नबीचा समावेश झाला आहे.
श्रीलंकेविरुद्धची ही मालिका ICC कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे. त्यामुळे भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल येथे आणि दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.
बुमराहची दुखापत
बुमराहच्या दुखापतीची BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) केलेल्या प्राथमिक तपासणी झाली. तेव्हा त्याच्या डाव्या गुडघ्यात अस्वस्थता जाणवत असल्याचे कळते. त्यामुळे मेडिकल पथकाने त्याला संघपुनरागमन करण्याआधी पूर्णपणे बरे होण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तो श्रीलंका दौऱ्याला मुकला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा अद्ययावत संघ- शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जास्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, औकिब नबी.
(Auqib Nabi has replaced Jasprit Bumrah in the Test series Vs Sri Lanka)






