अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 36वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33 धावांनी पराभूत केले. हा इंग्लंडचा स्पर्धेतील सहावा पराभव होता. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर खूपच निराश झाला. त्याने स्वत:च्या प्रदर्शनाविषयीही मोठे विदान केले. चला तर, बटलर काय म्हणाला जाणून घेऊयात…
या सामन्यात इंग्लंड (England) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 286 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने 48.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 253 धावाच केल्या. त्यामुळे इंग्लंडला हा सामना 33 धावांनी गमवावा लागला.
काय म्हणाला बटलर?
या दारुण पराभवानंतर जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला, “खूपच दु:ख होते. आम्ही स्वत:ला न्याय दिला नाही. 2019मध्ये जिंकणाऱ्या उंचीपर्यंत पोहोचणे खूपच कठीण आहे आणि सर्वांना माहिती आहे की, यासाठी किती काम करावे लागते. आमही लोकांना निराश केले आहे. झम्पा आणि स्टार्कमधील भागीदारीने त्रास दिला. वाटत होते की, धावांचा पाठलाग करणे सोपे जाईल. मी जो शॉट खेळला, त्यात खराब काहीच नव्हते, पण तो योग्यप्रकारे खेळू शकलो नाही.”
‘मी स्वत:ला आणि संघाला निराश केले’
पुढे बोलताना बटलर म्हणाला की, “आम्ही चेंडूने चांगले प्रदर्शन केले. मात्र, आम्ही आणखी चांगले करू शकत होतो. आम्ही त्यांना निराशाजनक छोट्या भागीदाऱ्या बनवू दिल्या. चारही बाजूंना दव असूनही आम्ही स्वत:ला सावरले आणि आम्हाला 30 धावा कमी पडल्या. शेवट चांगला नव्हता. मी तितके चांगले खेळू शकलो नाही, जितके मी खेळू शकत होतो. अशा महत्त्वाच्या स्थितीत, मला वाटते की, मी स्वत:ला आणि माझ्या संघाला निराश केले आहे. पुनरागमनाची एकमेव पद्धत नेट्सवर कठोर मेहनत करणे आणि पुढील सामन्यात पुनरागमन करणे आहे.”
इंग्लंडची फलंदाजी
सामन्यातील इंग्लंड संघाच्या फलंदाजीविषयी बोलायचं झालं, तर बेन स्टोक्स आणि डेविड मलान यांनीच अर्धशतके झळकावली. स्टोक्सने 64 धावा केल्या, तर मलानही 50 धावा करण्यात यशस्वी झाला. मोईन अली याने 42 धावांचे योगदान दिले. इतर कुणालाही खास खेळी करता आली नाही. इंग्लंडचे फलंदाज ऍडम झम्पा याच्या फिरकीपुढे टिकू शकले नाहीत. त्याने 3 विकेट्स घेतल्या.
आता इंग्लंडचा पुढील सामना बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध आणि त्यानंतर शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) पाकिस्तानविरुद्ध आहे. या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करून इंग्लंड संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (aus vs eng captain jos buttler statement after lose match against australia world cup 2023)
हेही वाचा-
Syed Mushtaq Ali Trophy: SRHच्या खेळाडूने आयुष बदोनीच्या खेळीवर फेरले पाणी, रियान परागचा संघ फायनलमधून बाहेर
‘या’ कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नव्हता विराट, वाचून काळजात होईल धस्स!