अॅडलेड। भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु असून या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. आज आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात दुसऱ्या सत्रापर्यंत 55 षटकात 4 बाद 117 धावा केल्या आहेत.
या सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट गेल्याने भारताचा पहिला डाव सर्वबाद 250 धावांवर आटोपला आहे.
त्यानंतर आॅस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात अॅरॉन फिंच आणि या सामन्यातून पदार्पण करणारा मार्क्यूस हॅरीस हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले.
पण पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. मात्र त्यानंतर हॅरीस आणि उस्मान ख्वाजाने सावध खेळ करत आॅस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
परंतू ही भागीदारी 44 धावांची झालेली असतानाच आर अश्विनच्या गोलंदाजीवर युवा फलंदाज हॅरीस 26 धावांवर बाद झाला. हॅरीसचा झेल सिली पॉइंटला उभ्या असणाऱ्या मुरली विजयने घेतला.
त्यानंतर पहिल्या सत्रात नाबाद असणाऱ्या शॉन मार्शने(2) दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात विकेट गमावली. त्याला अश्विनने त्रिफळाचीत केले आणि आॅस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. मार्शनंतर फलंदाजीसाठी आलेल्या पिटर हँड्सकॉम्बने ख्वाजाची चांगली साथ दिली होती.
पण डावाच्या 40 व्या षटकात ख्वाजाला 28 धावांवर अश्विनने बाद करत स्वत:ची या सामन्यातील तिसरी विकेट मिळवली. यानंतर मात्र हँड्सकॉम्ब आणि ट्रेविस हेड यांनी आॅस्ट्रेलियाचा डाव सावरताना दुसरे सत्र संपेपर्यंत नाबाद 30 धावांची भागीदारी रचत आॅस्ट्रेलियाला शतकी धवसंख्या पार करुन दिली आहे.
दुसरे सत्र संपले तेव्हा हेड 11 आणि हँड्सकॉम्ब 33 धावांवर नाबाद खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!
–चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार
–कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम