पाच दिवसांचा दिल्ली कसोटी सामना भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) अवघ्या 3 दिवसात फत्ते केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत 2-0ने मालिकेत आघाडी घेतली. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे ठेवली. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशात, पाहुण्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल डी वेनुटो यांनी मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) दुसऱ्या कसोटीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, दुसऱ्या कसोटीत त्यांच्या संघाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करून मोठी चूक केली. त्यांना भारताविरुद्ध सांभाळून खेळायला पाहिजे होतं.
काय म्हणाले फलंदाजी प्रशिक्षक?
मायकल डी वेनुटो (Michael Di Venuto) हे रणनीती बोलताना म्हणाले की, डाव संपण्यापर्यंत त्यांचे फलंदाज रणनीतीनुसार खेळ खेळत होते. ऑस्ट्रेलियाने 28 धावांच्या आत 8 विकेट्स गमावले होते. स्टीव्ह स्मिथ स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे संघाचा डाव 31.1 षटकात 113 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी भारताला 115 धावांचे आव्हान भेटले, जे त्यांनी 26.4 षटकात गाठले.
मायकल म्हणाले की, “निश्चितरीत्या आमची रणनीती चुकीची झाली होती. आम्ही चांगली रणनीती बनवली होती, पण जर खेळाडू रणनीतीने काम करणार नाहीत, तर त्यांना संकटांचा सामना करावा लागेल आणि आपण हेच पाहिले.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “सामन्यात निश्चितच त्यावेळी आमचं पारडं जड होतं आणि खेळाडूंना वाटले की, जर आपण पटापट 50 धावा आणखी केल्या, तर संघाला फायदा होईल. मात्र, या देशात तुम्ही असे करू शकत नाही. आम्ही यावर चर्चा केली होती, त्यामुळे असे नव्हते की, ही गोष्ट नवीन होती. मात्र, दबावात विचित्र गोष्टी होतात आणि आपण पाहिले आहे की, आमच्या अनेक दिग्गज खेळाडूंना क्रीझवर जाताच स्वीप शॉट खेळून धावा करायच्या असतात. ही निराशेची बाब असल्यासारखे नाहीये, पण फलंदाजीची ती 90 मिनिटे चांगली नव्हती.”
स्वीप शॉटवरून आगपाखड
ऑस्ट्रेलियाच्या अधिकतर फलंदाजांनी स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. तसेच, मायकल यांनीही मान्य केले की, जे खेळाडू हा शॉट व्यवस्थित खेळू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही जोखीम ठरू शकते. ते म्हणाले की, “हे निश्चितरीत्या स्पष्ट होते की, आम्ही कुठे चुका केल्या. फलंदाजीत आम्ही एकाच प्रकारची पद्धत वापरली. तुम्हाला या देशात सांभाळून खेळत पुढे जायचे असते. जर तुम्ही रणनीतीच्या बाहेर गेलात, तर तुमची संकटं वाढू शकतात.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसरा सामना 1 ते 5 मार्चदरम्यान इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला आठवडाभराचा वेळ आहे. अशात काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काहीजण आग्र्याचे ताजमहल पाहतायेत, तर काहीजण गोल्फ खेळत आहेत. (australia batting coach michael di venuto highlights on mistakes during ind vs aus 2nd delhi test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने धरले थेट कर्णधार कमिन्सला धारेवर! म्हणाले, “तू कमी पडतोय”
टी20 फलंदाजी क्रमवारीत भारतीय पोरींचा बोलबाला! तब्बल 5 जणी टॉप-20 मध्ये