सातवा पुरुष टी२० विश्वचषक रविवारी (१४ नोव्हेंबर) युएई येथे पार पडला. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करत प्रथमच टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. दुसरीकडे, न्यूझीलंडचे पहिल्या टी२० विश्वचषकाचे स्वप्न अपुरे राहिले. यासह ऑस्ट्रेलियाने आयसीसी बाद फेरीतील न्यूझीलंडवरील विजयाची मालिका कायम राखली.
न्यूझीलंडला पाहावा लागला पराभव
कमालीच्या एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सलग पाचव्यांदा आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत पराभव केला. न्यूझीलंडला आत्तापर्यंत एकदाही त्यांना बाद फेरीत पराभूत करता आले नाही. विशेष म्हणजे यामध्ये तीन अंतिम सामन्यांचा समावेश आहे. २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या, २०१५ वनडे विश्वचषकाच्या व आता टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे संघ आमने-सामने आलेले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने आपल्याच पाकिस्तानविरुद्धच्या एका विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानलाही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत पाच वेळा धूळ चारली आहे.
ऑस्ट्रेलियाने पटकावले विजेतेपद
आपल्या पहिल्यावहिल्या टी२० विश्वविजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या दोन्ही संघातील नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. उपांत्य सामन्याचा नायक डेरिल मिशेल झटपट तंबूत परतला. तर, अनुभवी मार्टिन गप्टिलने कमालीची संथ खेळी करत ३५ चेंडूत २४ धावा काढल्या. कर्णधार केन विलियम्सनने पुन्हा एकदा शानदार खेळी करून संघाला १७२ धावांची मजल मारून दिली. त्याने ८५ धावा बनविल्या. ऑस्ट्रेलियासाठी जोस हेजलवूडने तीन बळी मिळविले.
विजेतेपद पटकावण्यासाठी १७३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच ५ धावा काढून माघारी परतला. मात्र, डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्शने ९२ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. वॉर्नर अर्धशतक करून बाद झाल्यानंतर मार्शने अखेरपर्यंत नाबाद राहत ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्याचा मानकरी मार्श तर स्पर्धेचा मानकरी डेव्हिड वॉर्नर ठरला.