ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाची सध्याची टी२० क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांनी आधी पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिका गमावली आणि आता टी२० विश्वचषक २०२६च्या साखळी फेरीतूनच बाहेर झाले आहेत. त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. त्यांचे २०२८च्या ऑलिंपिकमधील स्थान धोक्यात आले आहे.
ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी ऑस्ट्रेलियाने प्रयत्न केले. एका दुर्दैवी विश्वचषकामुळे आता त्यांचे स्थान धोक्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाची आताची कामगिरी पाहता त्याचा परिणाम क्रमवारीत होईल. ज्यामुळे ते न्यूझीलंडच्या मागे जातील. टी२० विश्वचषक २०२६च्या नंतर जी क्रमवारी जाहीर त्यानुसार ऑलिंपिकमध्ये खेळणाऱ्या संघाबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला तर ते क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या पुढे जातील. सध्या न्यूझीलंड सुपर-८मध्ये पोहोचला आहे.
रिपोर्ट्सनुसार, आयसीसी त्या-त्या खंडातील संघ थेट निवडणार आहेत. त्यासाठी टी२० विश्वचषकानंतरच्या क्रमवारीचा विचार केला जाणार आहे. सध्या त्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र आयसीसीच्या निर्णयानुसार असे झाले तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपैकी न्यूझीलंडला थेट ऑलिंपिकमध्ये खेळण्याची संधी मिळेल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा क्वालिफायर्सचे सामने खेळावे लागतील.
न्यूझीलंडची टी२० विश्वचषकातील कामगिरी पाहिली तर त्यांनी २००७, २०१६, २०२१ आणि २०२२मध्ये उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आयसीसी टी२० क्रमवारी पाहिली तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी आला आहे, दुसरीकडे न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे या स्पर्धेअंती ते ऑस्ट्रेलियापुढे जातील आणि ऑस्ट्रेलियाचे ऑलिंपिकमधील थेट प्रवेशावर त्याचा परिणाम होईल.
ऑलिंपिक २०२८मध्ये महिला आणि पुरूष क्रिकेटचे प्रत्येकी ६-६ संघ असणार आहेत. यामध्ये आशिया खंडातील भारत, आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधून इंग्लंड यांचा प्रवेश जवळपास निश्चित आहे. या खंडातील कोणतेही संघ आयसीसी क्रमवारीमध्ये त्यांच्यापुढे नाहीत, तसेच अमेरिकाच ऑलिंपिकचे यजमानपद भुषवत असल्याने ते थेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील.





