सिडनी। आजपासून(13 मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. ही मालिका कोरोना व्हायरलसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या प्रेक्षकांच्या अनुपस्थिती खेळवली जाणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची शक्यता आहे.
त्याला पहिल्या वनडे सामन्याआधी कोरोना व्हायरसच्या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्याचा घसा खवखवत असल्याने त्याला सध्या ऑस्ट्रेलियन संघापासून दूर ठेवले असून त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पृष्टी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यानंतर रिचर्डसनमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
त्यामुळे सध्या त्याला संघातील खेळाडूंपासून दूर ठेवले आहे. तसेच त्याला आज न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही खेळवण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी राखीव खेळाडू म्हणून सीन ऍबॉटला ऑस्ट्रेलिया संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे.
याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की ‘आमचे वैद्यकिय पथक सध्या घश्याचे इन्फेक्शन असल्याचे समजून रिचर्डसनवर उपचार करत आहे. पण ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रोटोकॉलचेही आम्ही पालन करत आहोत. त्याचमुळे सध्या त्याला अन्य खेळाडूंपासून लांब ठेवले आहे.’
‘त्याच्या तपासणीचे रिपोर्ट आम्हाला मिळाल्यानंतर आणि केन बरा झाल्यानंतर तो पुन्हा संघात येऊ शकतो, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जोपर्यंत पुढील काही गोष्टी बदलणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.’
सध्या कोरोना व्हायरस झपाट्याने जगभरात पसरत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्रीडा स्पर्धांवर होत आहे. क्रीडा क्षेत्रात आत्तापर्यंत फुटबॉलमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 70 च्या वर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपुर्ण यादी- रणजी ट्राॅफी स्पर्धेचे आजपर्यंतचे सर्व विजेते आणि उपविजेते
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संभाव्य महिला खेळाडूंच्या यादीत ३ मराठमोळ्या खेळाडूंची वर्णी