यूएई येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (४ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात अ गटातील ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ समोरासमोर आले. दुबई येथील दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने या विजयासह उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने आपला एक जुना विक्रम सुधारित केला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. बांगलादेशच्या फलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. ऍडम झंपाने पाच तर, जोश हेजलवूड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन गडी आणि ग्लेन मॅक्सवेल याने एक गडी बाद केला. बांगलादेशचा डाव अवघ्या ७३ धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाने सुधारली आपली कामगिरी
या सामन्यात बांगलादेश संघाला ७३ धावांवर रोखत ऑस्ट्रेलियाने कोणत्याही संघाला सर्वबाद करण्याची ही सर्वोत्तम कामगिरी केली. यापूर्वी त्यांनी २००८ मध्ये भारतीय संघाला मेलबर्न येथे तर, याच दुबईच्या मैदानावर पाकिस्तान संघाला २०१२ मध्ये ७४ धावांवर सर्वबाद केलेले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी आशियाई संघांविरुद्ध केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय
उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना जिंकण्याचे ध्येय ऑस्ट्रेलियन संघासमोर होते. स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर झालेल्या बांगलादेश संघाने या सामन्यात देखील आपली ढिसाळ कामगिरी सुरू ठेवली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करत केवळ ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला कर्णधार ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी तुफानी सलामी दिली. फिंचच्या ४०, वॉर्नरच्या १८ व मिचेल मार्शच्या १६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ६.२ षटकात पूर्ण केले. पाच बळी मिळवणाऱ्या ऍडम झंपाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वेल ‘पेड’ इंडिया!’ भारत-अफगानिस्तान सामन्यानंतर ‘फिक्समॅच’ हॅशटॅग होतोय ट्रेंड
पाकिस्तानला पोटशूळ! म्हणे भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स; भारतीय चाहत्यांनी केली तोंडे बंद






