भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दुसरा वनडे सामना आणि मालिकादेखील गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३८९ धावांची मोठी धावसंख्या रचली होती. प्रत्युत्तरात, भारतीय संघ ३३८ धावा करू शकला. भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाला धारेवर धरले आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत चांगली कामगिरी करावी लागेल, असे म्हटले आहे. दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना लवकर बाद करण्यात अपयशी ठरले होते.
भारतीय गोलंदाजांनी स्विंग गोलंदाजी शिकावी
इंडिया टुडेशी बोलताना हरभजनने भारतीय संघाच्या खराब कामगिरीविषयी नाराजी व्यक्त केली. विशेषत:, भारतीय गोलंदाजांवर त्याने टीका केली. हरभजन म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील वातावरणात स्विंग गोलंदाजी एक चांगले हत्यार आहे. भारतीय गोलंदाज त्याचा वापर करून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणू शकतात. भारतीय गोलंदाजांना लवकरात लवकर स्विंग गोलंदाजीचे तंत्र अवगत करावे लागेल.”
कोहलीने गोलंदाजांचा खुबीने वापर करावा
हरभजनने भारतीय कर्णधार विराट कोहली याला देखील काही सल्ले दिले. तो म्हणाला, “विराटने गोलंदाजांचा खुबीने वापर करायला हवा. शमी चांगली गोलंदाजी करत असताना, त्याचा स्पेल पुढे वाढवायला हवा होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण लावावे लागेल.”
बुमराहचे चेंडू स्विंग होत नाहीत
भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या कामगिरीवर हरभजन अत्यंत नाखूष दिसला. बुमराह याविषयी बोलताना त्याने सांगितले, “त्याचे चेंडू अजिबात स्विंग होत नाहीत. तुम्ही दोन-तीन षटके जरी चेंडू स्विंग करू शकला, तरी फलंदाजांवर त्याचा दबाव बनतो. ऑस्ट्रेलियातील वातावरण भारतीय गोलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि त्यांनी त्याचा लवकरात लवकर फायदा उठवायला सुरुवात केली पाहिजे. बुमराह, शमी व सैनी यांना चेंडू स्विंग करता आला पाहिजे.”
पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज चेंडू स्विंग करण्यात अपयशी ठरले होते. नवीन चेंडूने बळी मिळवण्यात त्यांना यश आले नाही. चांगली सुरुवात झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने दोन्ही सामन्यात मोठ्या धावसंख्या उभारल्या. गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे फलंदाजांना लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी आल्या. परिणामत: भारतीय संघाला दोन्ही सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत
वनडेत सर्वाधिक महागडे ठरलेले ३ भारतीय स्पिनर; अव्वल क्रमांक ‘आश्चर्यकारक’