क्रिकेटमधे वेगवान गोलंदाजांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. नवीन चेंडूंवर बळी मिळवणे असो किंवा शेवटच्या षटकात धावा रोखणे, कर्णधार अनेकदा वेगवान गोलंदाजांवर विसंबून असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत बर्याच वेगवान गोलंदाजांनी मैदान गाजवले आहे. आपल्या वेगाने आणि अचूकतेने फलंदाजांना धडकी भरवणारे वेगवान गोलंदाज, हे दृश्य क्रिकेट चाहत्यांना नेहमीच पाहायला आवडते.
वेगवान गोलंदाजांना वेग, अचूकता आणि लय मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे त्यांचा रन-अप. योग्य समतोल साधणारा रन-अप गोलंदाजीची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि गोलंदाजांची तंदुरुस्ती सांभाळण्यासाठी आवश्यक असतो. कुठला रन-अप अधिक योग्य आहे, असे ठरविणे अवघड असते. कारण वैचित्र्यपूर्ण शैलीचा रन-अप असलेल्या गोलंदाजांनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळविले असल्याचीही उदाहरणे आहेत. पण या लेखात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील ५ वेगवान गोलंदाजांच्या रन-अपची माहिती घेणार आहोत, ज्यांनी आदर्शवत रन-अपसह सातत्याने बळी मिळविले आहेत.
५. डेल स्टेन
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा अलीकडच्या काळातील अव्वल वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. गेले काही वर्षे तो फॉर्मसाठी झुंजत असला, तरी कारकिर्दीच्या शिखरावर असताना ‘स्टेनगन’चा भल्या- भल्या फलंदाजांना धाक वाटायचा. स्टेनचा रन-अप आणि त्याची ऍक्शन अतिशय आदर्शवत होती. मध्यम अंतराचा रन-अप आणि फ्रंटऑन एक्शन, यामुळे १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणे, स्टेनला शक्य व्हायचे.
४. फ्रॅंक टायसन
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज फ्रॅंक टायसन हे जगातील सार्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जातात. टायसन यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ १७ कसोटी सामने खेळले. मात्र, त्यांनी वेगवान गोलंदाजीच्या क्षेत्रात विशेष छाप सोडली. त्यांच्या प्रचंड वेगामुळे त्यांचे ‘टायफून टायसन’ असे टोपणनाव पडले होते. त्यांच्या वेगाचे रहस्य त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रन-अप मध्ये होते.
३. डेनिस लिली
ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली वेगवान गोलंदाजीतील जणू एक दंतकथाच होते. त्यांच्या वेगामुळे संपूर्ण कारकिर्दीत प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये त्यांची दहशत होती. मोठ्या अंतराचा रन-अप हे डेनिस लिलींच्या गोलंदाजीचे खास वैशिष्ट्य होते. क्रीज जवळ आल्यावर मोठी उडी घेत गोलंदाजी करणारे लिली, ही छबी आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
२. शोएब अख्तर
‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज समजला जातो. १६१.३ किमी प्रतितासाच्या वेगाने त्याने टाकलेला चेंडू जगातील सर्वात वेगवान चेंडू आहे. अख्तरच्या वेगाचं कारण त्याचा भलामोठा रन-अप असल्याचे मानले जाते. सीमारेषेपासून सुरू होणार्या त्याच्या रन-अपमुळे त्याच्या षटकांची गती कायमच संथ असे.
१. मायकेल होल्डिंग
वेस्ट इंडिजने जागतिक क्रिकेटला अनेक महान वेगवान गोलंदाज दिले. ऐंशीच्या दशकातील वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांची फळी अतिशय परिपूर्ण होती. याच फळीतील मायकेल होल्डिंग हा वेगवान गोलंदाज इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. दबक्या पावलांनी रन-अप घेणार्या होल्डिंगना त्यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे ‘मौत की आहट’ असे टोपणनाव देखील मिळाले होते. त्यांच्या रन-अपमध्ये फार वेग नसला, तरीही त्यांच्या गोलंदाजीचा वेग प्रतितास १४० किमी पेक्षाही अधिक असे, त्यामुळे अनेकदा फलंदाज फसत असत. म्हणूनच होल्डिंगचा रन-अप हा सर्वाधिक आदर्शवत रन-अप समजला जातो.
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल