जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या (Asian Games) क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने जबरदस्त विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. निशीन येथे आज (शुक्रवार, 18 सप्टेंबर) भारत विरुद्ध जपान उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगला, जो भारताने 8 विकेट्सने जिंकला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जपान महिला क्रिकेट संघाचा हा पूर्ण सदस्य संघाविरुद्ध पहिलाच सामना होता. नुकतेच आशिया चषक जिंकलेल्या संघाने नेहमीप्रमाणे उत्तम सुरूवात केली. सध्या आयसीसी टी20 क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या श्री चरणाने एकाच षटकात दोन विकेट्स घेत संघाला चांगली सुरूवात करून दिली.
चरणीने तिच्या दुसऱ्या आणि जपानच्या डावातील सातव्या षटकात एकही धाव न देता दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व दिसले. जपानचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत 57 धावासंख्येवर बाद झाला. चरणीची गोलंदाजी प्रभावी ठरली. तिने 4 षटकांत 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. शफाली वर्माने दोन, तर श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना शफालीने भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली. तिने पहिल्याच षटकात चार चौकार मारले. दुसऱ्या षटकात भारताने एकही धाव केली नाही, मात्र एक विकेट गमावली. जी कमलिनी शून्यावर बाद झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शफालीने सुत्रे हातात घेत पाचव्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
भारताने डावाच्या पाचव्या षटकात 20 धावा करत विजय मिळवला. शफाली 15 चेंडूंत 40 धावा आणि विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोष 12 (6) धावा करत नाबाद राहिली.
भारतीय महिला संघाचा हा चेंडूंच्या संख्येनुसार सर्वात मोठा विजय होता. भारताने जपानविरुद्ध 90 चेंडू शिल्लक राखत विजय मिळवला.
या स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना 20 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. तसेच महिला क्रिकेट संघाचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात 20 सप्टेंबर रोजीच खेळला जाणार आहे. (Comfortable 8 wicket win for India women in quarter-final vs Japan women to seal a spot in final four Asian Games 2026)






