आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणे हे प्रत्येक फलंदाजासाठी खास असते. प्रत्येक शतकामागे सरावात घेतलेली अविश्रांत मेहनत लपलेली असते. अशावेळी सलग तीन शतके ठोकणे, हे कठोर मेहनतीचे आणि फलंदाज शानदार फॉर्ममध्ये असल्याचे लक्षण आहे.
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये काही दिग्गज फलंदाजांनी सलग तीन शतके झळकवण्याचा पराक्रम गाजवला आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील दुसर्या सामन्यात शतक ठोकून स्टीव स्मिथने देखील भारतीय संघाविरुद्ध सलग तीन शतके करण्याचा मान पटकाविला. स्मिथच्या आधीही अजून तीन फलंदाजांनी देखील ही कामगिरी केली होती.
या लेखात आपण अशाच तीन फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांत भारतीय संघाविरुद्ध सलग तीन शतके झळकाविले आहेत.
१. झहीर अब्बास
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी फलंदाज जहीर अब्बास ह्यांनी भारताविरुद्ध सर्वप्रथम सलग तीन वनडे सामन्यांत शतक ठोकले होते. १९८२-८३ साली ही कामगिरी त्यांनी केली होती. सलग तीन सामन्यांमधे जहीर अब्बास यांनी अनुक्रमे ११८, १०५ आणि ११३ धावांच्या खेळी उभारल्या होत्या.
२. नासिर जमशेद
भारतीय संघाविरुद्ध तीन वनडे शतके झळकविण्याची कामगिरी जहीर अब्बास यांच्यानंतर पुन्हा एकदा एका पाकिस्तानी फलंदाजानेच केली. पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेद याने २०१२-१३ साली ही कामगिरी केली होती. यातील पहिले शतक ११२ धावांच्या खेळीसह ढाका येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यांतील होते, तर अनुक्रमे १०१ नाबाद आणि १०६ अशा धावसंख्येच्या खेळी पाकिस्तानी संघाच्या भारतीय दौऱ्यात नासिर जमशेदने उभारल्या होत्या.
३. क्विंटन डी कॉक
सन २०१३ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर असतांना आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक जबरदस्त फॉर्मात होता. त्यावेळी खेळविण्यात आलेल्या ३ वनडे सामन्यांचा मालिकेत डी कॉक १३५, १०६ आणि १०१ अशा धावांसह भारताविरुद्ध वनडे सामन्यांत सलग तीन शतके झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. ह्या मालिकेत क्विंटन डी कॉकने आपल्या फलंदाजीने मालिकावीराचा पुरस्कारही पटकाविला.
४. स्टीव स्मिथ
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव स्मिथने भारताविरुद्ध नेहमीच दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतही इतिहासाची पुनरावृत्ती करत पहिल्या दोन्ही सामन्यांत स्मिथने शतक झळकाविले. तसेच या मालिकेपूर्वी स्मिथने भारताविरुद्ध बेंगलोरमध्ये खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यांत देखील शतक ठोकले होते. त्यामुळे आता भारताविरुद्ध वनडे सामन्यांत सलग तीन शतके करणार्या फलंदाजांच्या रांगेत स्मिथ सुद्धा सामील झाला आहे.
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”