टी२० विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक मोठे संघ पाकिस्तानचा दौरा करण्यास अजूनही धजावत नाहीत. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेटसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जगातील मातब्बर संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने पुढील वर्षाच्या सुरुवातीस पाकिस्तानचा लांबलचक दौरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
तब्बल २४ वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा
ऑस्ट्रेलियन संघाने आपला अखेरचा पाकिस्तान दौरा सन १९९८ मध्ये केला होता. त्यानंतर आता २२ वर्षानंतर या दौऱ्याला मुहूर्त सापडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी या दौऱ्याची घोषणा करताना म्हटले,
“पुढील वर्षी पाकिस्तान दौरा करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया खूप उत्साही आहे. क्रिकेटसाठी एक वेगळ्या प्रकारची क्रेझ असलेल्या देशाचा दौरा करण्यासाठी आम्ही अत्यंत खुल्या दिलाने जाऊ.”
असा असेल दौरा
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरू होईल. ३ ते ७ मार्च या काळात कराची येथे पहिली कसोटी खेळली जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च या कालावधीत रावळपिंडी व २१ ते २५ मार्च या काळात लाहोर येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने लाहोर येथे २९ मार्च, ३१ मार्च व २ एप्रिल रोजी होतील. ५ एप्रिल रोजी लाहोर येथेच दौऱ्यावरील अखेरीचा सामना टी२० स्वरूपाचा होईल.
न्यूझीलंड इंग्लंडने रद्द केला दौरा
टी२० विश्वचषकाच्या पूर्वी न्यूझीलंड संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र, दौऱ्यावरील पहिला सामना सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी न्यूझीलंड संघाने दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर, विश्वचषकाचा तोंडावर इंग्लंड संघ पाकिस्तानमध्ये टी२० मालिका खेळणार होता. मात्र, त्यांनीदेखील या दौऱ्याला अखेरच्या क्षणी नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या-





