---Advertisement---

शफाली-जेमिमाच्या फटकेबाजीने जिंकले मन; मात्र, पावसाने सामना झाला रद्द

---Advertisement---

सर्व क्रिकेटविश्वाची नजर युएई येथे खेळविण्यात येत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगकडे (आयपीएल २०२१) असताना भारतीय महिला क्रिकेट संघ व ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट यांच्या दरम्यान क्रिकेट मालिका सुरू आहेत. गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) उभय संघांमध्ये तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.

भारतीय संघाची दमदार फलंदाजी
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार मेग लेनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना व शफाली वर्मा यांनी ३.२ षटकात भारतीय संघाला ३० धावांची सलामी दिली. शफालीने आपल्या १८ धावा या तीन षटकारांनी ठोकल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर व यस्तिका भाटिया यांनी अनुक्रमे १२ व १५ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने १५.२ षटकात १३१ धावा बनविलेल्या असताना पावसाचे आगमन झाले. अत्यंत मुसळधार पावसामुळे यानंतर सामन्याचा खेळ होऊ शकला नाही व सामना रद्द करण्यात आला. सामना थांबवण्यात आला त्यावेळी जेमिमा ३६ चेंडूत नाबाद ४९ धावाकडून नाबाद राहिली. तीने ७ चौकार लगावले. रीचा घोष हीदेखील १७ धावा काढून नाबाद राहिली. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (९ ऑक्टोबर) खेळला जाईल.

वनडे मालिकेत भारताचा पराभव
भारतीय संघाने या दौऱ्यावर आत्तापर्यंत तीन सामन्यांची वनडे मालिका व एक कसोटी सामना खेळला आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला २-१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दोन्ही संघातील एकमेव कसोटी अनिर्णित राहिली होती. या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर स्मृती मंधाना हिने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---