मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने 5 व्यांदा महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014 आणि 2018 या वर्षी महिला टी20 विश्वचषकाला गवसणी घातली होती.
आजच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या आणि भारताला 185 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 99 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 33 धावा केल्या. अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताकडून दिप्ती व्यतिरिक्त केवळ स्म्रीती मंधना(11), वेदा कृष्णमुर्ती(19) आणि रिचा घोष(18) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मेगन शटने 3 विकेट्स घेतल्या आणि सोफी मोलिनेक्स, डेलिसा किमिन्स आणि निकोला कॅरी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 54 चेंडूत नाबाद सर्वाधिक 78 धावा केल्या. यामध्ये 10 चौकारांचा समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक एलिसा हिलीने 39 चेंडूत 75 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. या दोघींनी मिळून सलामीला 115 धावांची भागीदारी रचली.
या दोघींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. कर्णधार मेग लॅनिंगला 16 धावांवर समाधान मानावे लागले.
भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने 4 षटकात सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर पुनम यादव आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारतीय संघ पहिल्यांदाच आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. परंतु, भारतीय संघाला या सामन्यात उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले.