आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असून ऑस्ट्रेलियाने त्यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका जिंकली. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार, 7 ऑक्टोबर रोजी ब्रिसबेनमध्ये पार पडला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने या मालिकेत पाहुण्या वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (2-0) दिला. दुसरा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने सर्वात महत्वाचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि वेस्ट इंडीजला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ 8 विकेट्सच्या नुकसानावर 147 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणाणी ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) 41 चेंडू खेळला आणि सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. या धावा त्याने 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने केल्या. या महत्वाच्या खेळीसाठी वॉर्नरला विजयानंतर सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले.
ऑस्ट्रेलियाकडून मोठे लक्ष्य मिळाल्यानंतर वेस्ट इंडीज संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांच्या खेळाडूंनी ठरावीक वेळेनंतर नियमित विकेट्स गमावल्या. वेस्ट इंडीजचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. सलामीवीर जॉनसन चार्ल्स सर्वाधिक 29 धावा करून बाद झाला. अकील हुसेन याने 25 धावा केल्या. तर ब्रँडन किंग याने 23 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्ट्रार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.
वेस्ट इंडीजसाठी पहिल्या टी-20 सामन्यात 39 धावांची अप्रतिम खेळी करणाऱ्या कायल मेयर्स या सामन्यात सर्वात धावा बाद झाला. त्याने 5 चेंडूत 6 धावा केल्या. तसेच कर्णधार निकोलस पूरन देखील जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याने अवघ्या 2 धावा करून विकेट गमावली. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने जेसन होल्डरला 16 धावांवर बाद केले. त्याने अवघ्या 20 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. तसेच दिग्गज पॅट कमिन्सने 32 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये वॉर्नरव्यतिरिक्त टिम डेविड देखील चांगले प्रदर्शन करू शकला. त्याने 20 चेंडूत 42 धावांची ताबडतोड फलंदाजी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तुम्ही म्हणाला तर उलटा लटकून…’, नेटकऱ्याला पाकिस्तानी अष्टपैलूकडून चोख प्रत्युत्तर
परळीची श्रद्धा गायकवाड खेळणार ऑलिम्पिक, धनंजय मुंडेंनीही केलंय कौतुक; National Games 2022