टी20 विश्वचषक 2024 सुरू व्हायला आता फार कमी दिवस उरले आहेत. जगातील या सर्वात मोठ्या टी20 स्पर्धेसाठी अनेक देशांचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. मात्र बलाढ्य ऑस्ट्रेलियानं अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. सध्या अनेक ऑस्ट्रेलियन फलंदाज आयपीएल मध्ये आपली ताकद दाखवत आहेत. आयपीएल 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजांनी आतापर्यंत कशी कामगिरी केली ते थोडक्यात जाणून घेऊया.
ट्रॅव्हिस हेड – ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप हिरो ट्रॅव्हिस हेड सध्या जबरदस्त फार्मात आहे. तो आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 216 च्या स्ट्राईक रेटनं 324 धावा ठोकल्या आहेत. हेडनं या आयपीएलमध्ये आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकंही झळकावली आहेत. 102 ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
डेव्हिड वॉर्नर – दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आयपीएल 2024 मध्ये त्यानं आतापर्यंत 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 135.77 च्या स्ट्राइक रेटनं 167 धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये वॉर्नरने आतापर्यंत केवळ एक अर्धशतक झळकावलंय. 52 ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
जेक फ्रेझर मॅकगर्क – ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आयपीएल 2024 मध्ये त्यानं आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 222.22 च्या तुफानी स्ट्राईक रेटनं 140 धावा ठोकल्या आहेत. या 3 सामन्यांमध्ये त्यानं दोन अर्धशतकेही झळकावली. 65 ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
ग्लेन मॅक्सवेल – आयपीएल सुरु होण्यापूर्वी स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल तुफान फार्मात होता. मात्र आयपीएल 2024 मध्ये त्याची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. यानंतर त्यानं सध्या ब्रेक घेतला आहे. आयपीएल 2024 मध्ये मॅक्सवेलच्या बॅटमधून 6 सामन्यांमध्ये केवळ 32 धावा निघाल्या आहेत. मात्र टी20 विश्वचषकात जर त्याला त्याचा जुना फॉर्म सापडला तर तो नक्कीच धोकादायक ठरू शकतो.
मिशेल मार्श – आयपीएल 2024 मध्ये मिशेल मार्श दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र 4 सामने खेळल्यानंतर त्यानं दुखापतीमुळे माघार घेतली. या चार सामन्यांमध्ये मार्शनं 160.53 च्या स्ट्राइक रेटनं फक्त 61 धावा केल्या. मिचेल मार्शनं या आयपीएलमध्ये एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलं नाही.
मार्कस स्टॉयनिस – आयपीएलच्या या हंगामात मार्कस स्टॉयनिस लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. त्यानं आतापर्यंत 8 सामने खेळले, ज्यामध्ये 159.75 च्या स्ट्राइक रेटनं 254 धावा ठोकल्या आहेत. स्टॉयनिसनं चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद शतक झळकावून इतर संघांना इशारा दिला आहे. चेन्नईविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं नाबाद 124 धावा ठोकून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
टिम डेव्हिड – मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2024 मध्ये त्यानं आतापर्यंत 8 सामने खेळले. टिम डेव्हिडची या हंगामातील कामगिरी फारसी खास राहिलेली नाही. त्यानं 154.26 च्या स्ट्राईक रेटने केवळ 145 धावा केल्या आहेत. टीम डेव्हिडनं या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
इरफान पठाणनं निवडला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ; हार्दिक पांड्याला स्थान, मात्र एका अटीवर…
रवींद्र जडेजाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देणं चेन्नईलाच पडतंय महागात? कसं ते समजून घ्या
मार्कस स्टॉयनिसनं केलं चेन्नईला शांत! सीएसकेचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव