ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकन संघात २०१८ साली झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरण घडले होते. तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणात दोषी सापडले होते. मात्र आता या प्रकरणात सामील असलेल्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने त्यावेळी गोलंदाजांनी देखील या प्रकरणाची माहिती असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.
या खुलाशामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. बॉल टॅम्परिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची देखील शक्यता निर्माण झाली होती. पण आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुढे येत या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जारी केले प्रसिद्धी पत्रक
कॅमरून बॅनक्रॉफ्टने काही दिवसांपूर्वी बॉल टॅम्परिंग प्रकरणी चेंडूशी छेडछाड केल्याची कल्पना गोलंदाजांना देखील असल्याचे विधान केले होते. त्यामुळे संशयाची सुई गोलंदाजांकडे वळली होती. मात्र आता त्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेले मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड आणि नॅथन लॉयन यांनी पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे. या चौघांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात चेंडूशी छेडछाड केली जात असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, तसेच त्यासाठी सँडपेपर मैदानावर आणला गेला आहे, याबाबत देखील कुठलीही कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे.
“आम्ही देखील मोठ्या स्क्रीनवर ज्यावेळी सँडपेपर मैदानावर असल्याचे फोटो पाहिले होते, त्याचवेळी आम्हाला त्याबाबत कळाले होते. त्याआधी आम्हाला याबाबत काहीही कल्पना नव्हती. अनेकांनी असे आरोप केले आहेत की सँडपेपर चेंडूवर घासल्या गेल्यावर चेंडूत बदल झाल्याचे तर आम्हाला नक्कीच कळाले असेल. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की पंचांनी देखील जेव्हा चेंडू पाहिला, तेव्हा त्यानाही त्यात काही बदल जाणवला नव्हता. त्यामुळे आमच्यावरील हा आरोप निरर्थक आहे”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
काय होते प्रकरण?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. कॅमरून बॅनक्रॉफ्ट त्यावेळी सँडपेपर लपवत असल्याचे तसेच त्याने चेंडूशी छेडछाड करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने याबाबत कबुली दिल्यानंतर स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाच्या बंदीची तर कॅमरून बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! यूके आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंना मिळणार लसीचा दुसरा डोस
ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक
मोठी बातमी! ‘मिस्टर ३६०’ पुन्हा दिसणार नाही दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत; बोर्डाने केले स्पष्ट






