इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच २९ मे रोजी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएल खेळवण्या बाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात येणार आहे. या उर्वरित स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभाग घेतील का? यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी आपले मत मांडले आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी सुखरूप परतले होते. परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या सरकारने घालून दिलेल्या नियमांमुळे गेले काही दिवस विलगिकरणात रहावे लागले होते. सोमवारी(३१ मे) हे खेळाडू आपल्या घरी पोहोचले आहेत. अशातच बीसीसीआयने म्हटले आहे की, आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
याबाबत बोलताना निक हॉकले म्हणाले की, “जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा आयपीएलबाबत नक्कीच चर्चा करु. आमचे जे खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळून परतले आहेत ते नुकतेच सोमवारी विलगिकरनातून बाहेर आले आहेत. आमची पहिली प्राथमिकता त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटू देणे हीच असणार आहे. त्यानंतर आम्हाला वेस्ट इंडीज दौऱ्याची देखील तयारी करायची आहे.”
आयपीएल २०२१ स्पर्धा ४ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच खेळाडूंनी आपल्या घराची वाट धरली होती. परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षकांना ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी १५ मेपर्यंत सीमाबंदी केली असल्याने मालदीवला पाठवण्यात आले होते. त्यांनतर २ आठवड्यांनी मालदीववरून हे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले होते. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतरही त्यांना हॉटेलमध्ये १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागला. त्यानंतरच ते सोमवारी आपल्या कुटुंबाला भेटू शकले.
याबाबत बोलताना निक हॉकले म्हणाले की, “यावेळी जे काही घडले त्यामुळे खेळाडू थोडे विचलित झाले आहेत. परंतु घरी येऊन त्यांना पुन्हा एकदा आनंद झाला आहे. ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.”
बीसीसीआय लवकरच परदेशी क्रिकेटपटूंबाबत चर्चा करणार आहे. त्यानंतरच सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मुख्यतः वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डसोबत बीसीसीआय चर्चा करणार आहे. कारण येणाऱ्या काही महिन्यात, ऑस्ट्रेलियन संघाचा कार्यक्रम खूप व्यस्त असणार आहे. तसेच ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय पुरेपूर प्रयत्न करेल की, सर्व स्टार खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत सहभाग घ्यावा.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले, शुबमन गिलचा ‘तो’ शॉट त्याच्या फलंदाजीतील मोठी कमजोरी
ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त