भारतीय महिला संघाची युवा फलंदाज शेफाली वर्माने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम केले आहेत. ती आयसीसी महिला टी-२० क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. याच कामगिरीची दखल घेत तिला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि वनडे मालिकेतही संधी देण्यात आली आहे. २ जून रोजी भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तिने या दौऱ्यासाठी खास तयारी केली आहे. याचा खुलासा तिने दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
शेफाली वर्माने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “यावर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेकरिता आयोजित करण्यात आलेल्या पुरुष क्रिकेटपटूंच्या सराव शिबिरात मी देखील सहभाग घेतला होता. ज्यामुळे मला बॅकफुटमध्ये आणखी सुधारणा करण्याची संधी मिळाली.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “मी हर्षल पटेल सोबत देखील चर्चा केली होती, ज्याने नुकतीच आयपीएल स्पर्धा खेळली आहे. मला मोहित शर्मा आणि राहुल तेवतिया यांच्याकडून बाऊन्सर चेंडू कसा खेळावा, याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. मी हरियाणा क्रिकेट संघातील सर्वांचेच मनापासून आभार मानते ज्यांनी मला संधी दिली होती.”
भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा १६ जून पासून सुरू होत आहे. यामध्ये त्यांना एकमात्र कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासोबतच शेफाली, बिग बॅश लीग आणि ‘द हंड्रेड’ क्रिकेट लीग या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यासाठी ती वेट सिंथेटिक चेंडूने सराव करत आहे.
भारतीय महिला संघ आणि पुरुष संघसह २ जून रोजी इंग्लंडला खाजगी विमानाने रवाना होणार आहे. भारतीय पुरुष संघाला येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यांनतर भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भल्या- भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे भाष्य; पाहा काय म्हणतोय
“जे उपलब्ध नसेतील त्यांच्यासाठी ही आयपीएल थांबवली जाणार नाही”