---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक हृदयविकाराच्या झटक्यानंतर गेले कोमात; देतायत आयुष्याच्या लढाईशी झुंज

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 7:04 PM
Rod-Marsh
---Advertisement---

क्रीडाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक रॉड मार्श (Rod Marsh) हृदयविकाराचा झटका आल्याने कोमात गेले आहेत. मार्श हे एका चॅरिटी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बुंडाबर्ग येथे गेले होते. तिथे गेले असता, त्यांच्या हृदयाने काम करणे बंद केले होते. त्यानंतर बुल्स मास्टर्सचे आयोजक जॉन ग्लेनविल आणि डेविड हिलियन यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या दोघांनी रुग्णवाहिकेची वाट पाहिली असती, तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती, असे बुल्स मास्टर्सचे जिमी माहेर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्श यांच्या कुटुंबियांच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात असे सांगितले आहे की, “रॉड मार्श हे आयुष्याची लढाई लढत आहेत. ते कोमामध्ये आहेत.” त्यांचा मुलगा पॉल म्हणाला की, “आम्हाला माहिती आहे की, वडिलांच्या तब्येतीबद्दल खूप लोकांना जाणून घ्यायचे आहे आणि आमच्या कुटुंबाला जगभरातून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याच्या संदेशासाठी मी त्यांचा आभारी आहे. आम्ही सर्वांचे मेसेज वाचले आणि ऐकले. आम्ही सर्वांचे आभारी आहोत.”

मार्श हे सध्या ७४ वर्षांचे आहेत. त्यांच्या कारकिर्दीद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १९७० ते १९८४ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी ९६ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी २६.५१ च्या सरासरीने ३६३३ धावा केल्या. त्यांच्या नावावर ३ शतके आणि १६ अर्धशतके आहेत.

ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ताही राहिले आहेत मार्श
मार्श यांच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ९२ वनडे सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्यांनी २०.०८ च्या सरासरीने १२२५ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर ४ अर्धशतकेही आहेत. मार्श यांनी २०१६ पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचे निवडकर्ता पदही भूषवले आहे.

त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे ४७९ विकेट्सही घेतल्या आहेत. यात ४६३ झेल आणि १६ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. ते ऑस्ट्रेलियाचे ऍडम गिलख्रिस्ट (९०५) आणि इयान हेली (६२८) यांच्यानंतर यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेला क्लीन स्वीप देत भारताने लावली विक्रमांची रांग! मायदेशात सर्वाधिक विजयाबरोबरच ‘हे’ पराक्रमही नावावर

टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी

तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---