भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा या (नोव्हेंबर) महिनाअखेरीस सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून खेळाडू लवकरच सराव करताना दिसतील. मात्र, या मालिकेपूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. कर्णधार विराट कोहली ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी’ या नावाने खेळवल्या जाणाऱ्या संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. कर्णधार कोहली लवकरच पिता होणार आहे. त्यामुळे, तो ऍडलेड येथील पहिल्या कसोटीनंतर भारतात परतेल. भारतीय कर्णधार संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने, प्रतिस्पर्धी गोलंदाज खुश होण्याऐवजी निराश झाले आहेत.
विराट नसल्याने नॅथन लायन झाला निराश
विराट कोहली मालिकेतील अखेरच्या तीन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. या बातमीमुळे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन निराश झाला आहे. कोहली संपूर्ण मालिकेत सहभागी होणार नाही.
ही गोष्ट समजल्यानंतर लायन म्हणाला, “जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांचा सामना करण्याची संधी रोज मिळत नाही. जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा सामना संपूर्ण मालिकेत करता येणार नाही, म्हणून मी निराश आहे. या मालिकेच्या दृष्टीने ही खेदजनक बाब आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्यासह कोहली हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, असे मला वाटते. कोहली नसला, तरी भारतीय संघाकडे बरेच मॅचविनर खेळाडू आहेत.”
भारतीय संघ आहे संतुलित
लायन सध्याच्या भारतीय संघाविषयी म्हणाला, “विराट व्यतिरिक्त अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे अनुभवी खेळाडू देखील भारतीय संघाचा भाग आहेत. सोबतच, बरेच युवा खेळाडू देखील या संघात दिसून येतात. मालिका नक्कीच आव्हानात्मक होईल, यात शंका नाही. विराट संघात नाही, म्हणून आम्ही सहजरीत्या जिंकू हा समज चुकीचा आहे. आम्हाला अधिक मेहनत आणि सराव करावा लागणार आहे.”
भारतीय संघ या संपूर्ण दौऱ्यावर तीन वनडे सामने, तीन टी२० सामने व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरला वनडे मालिकेने होईल, तर १७ डिसेंबरपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना हा दिवस- रात्र कसोटी सामना असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
-संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर