भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पुढील काही महिने खूप व्यस्त राहणार आहेत. कारण आगामी काळात अनेक मालिका आणि स्पर्धा होणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ सध्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यामध्ये व्यस्त आहे आणि त्यानंतर आयपीएल २०२१ आणि आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा होणार आहे. याचदरम्यान भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायला आहे.
भारतीय महिला संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. हा भारतीय महिला संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तसेच या दौऱ्यात ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकाही होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, यजमान ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
या तिन्ही मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाने १८ सदस्यीय संघाची निवड केली आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या २ दिग्गज गोलंदाजांचा समावेश नाही. संघाच्या नेतृत्वाची कमान अनुभवी कर्णधार मेग लेनिंगच्या हातात राहील. तर एलिसा हेली, एलीस पेरी, रॅचेल हेन्स आणि ॲशले गार्डनरसारख्या खेळाडू या संघाचा भाग आहेत. तथापि, संघात वेगवान गोलंदाज मेगन शट आणि फिरकीपटू जेस जोनासनचा समावेश करण्यात आला नाही. त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे मालिकेतून वगळण्यात आले आहे.
दोन नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संधी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते, अनुभवी वेगवान गोलंदाज शटने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने निवडकर्त्यांना या संपूर्ण मालिकांसाठी तिच्या निवडीचा विचार करू नये, असे आवाहन केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ते शटच्या निर्णयाचा आदर करतात आणि म्हणून तिची निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर जोनासन दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडली आहे.
या खेळाडूंच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज जॉर्जिया रेडमायन आणि १९ वर्षीय वेगवान गोलंदाज स्टेला कॅम्पबेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंना प्रथमच ऑस्ट्रेलियन संघात बोलावण्यात आले आहे. १९ सप्टेंबरपासून एकदिवसीय सामन्याने मालिका सुरू होईल. तर एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना ३० सप्टेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाईल. तसेच ७ ऑक्टोबरपासून टी -२० मालिका सुरू होणार आहे.
१८ जणींचा ऑस्ट्रेलियन संघ
मेग लेनिंग (कप्तान), रेचल हेन्स, डार्सी ब्राउन, मेटलन ब्राउन, स्टेला कॅम्पबेल, निकोला कॅरी, हॅना डार्लिंगटन, ॲशले गार्डनर, एलिसा हेली, ताहिला मॅक्ग्रा, सोफी मॉलिन्यू, बेथ मूनी, एलीस पेरी, जॉर्जिया रेडमायन, मॉली स्ट्रॅनो, एनाबेल सदरलँड, टायला व्लेमिंक, जॉर्जिया वेयरहम.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणासाठी बीसीसीआय मानतेय चाहत्यांचे आभार
तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ फडकवणार विजयी पताका? हेडिंग्ले मैदानावर असा आहे भारताचा रेकॉर्ड
टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम विराटच्या दृष्टीक्षेपात!