ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये पार पडलेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ४-१ ने विजय मिळवला होता. त्यानंतर सोमवारी (२६ जुलै) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने एकहाती विजय मिळवत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे.या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरोन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय चुकीचा ठरताना दिसून आला होता. अवघ्या ७५ धावांवर वेस्ट इंडिजचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. परंतु सलामीवीर फलंदाज एविन लुईसने एकहाती झुंज देत वेस्ट संघाचा डाव सावरला. त्याने ६६ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाची साथ न मिळाल्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा डाव ४५.१ षटकात १५२ धावांवर संपुष्टात आला होता.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नव्हती. अवघ्या ६५ धावांवर ऑस्ट्रेलिया संचाचे ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा डाव ९९ धावांवर ४ बाद असा होता. परंतु शेवटी मॅथ्यु वेडच्या नाबाद ५१ आणि एस्टन एगरच्या १९ धावांच्या खेळीच्या जोरावर हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला. तसेच ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
मालिका जिंकून मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ही १२ वी द्विपक्षीय वनडे मालिका होती. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला ७ मालिका जिंकण्यात यश आले आहे; तर २ वेळेस या मालिकांमध्ये वेस्ट इंडिज संघाने बाजी मारली आहे. तर ३ मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. तसेच वेस्ट इंडिज संघाने शेवटची वनडे मालिका १९१६ मध्ये जिंकली होती. त्यानंतर तब्बल २६ वर्षे उलटून गेली आहे. तरीदेखील वेस्ट इंडिज संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेत विजय मिळवण्यात यश आले नाही.
नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ११ गडी बाद केले होते. यासह त्याला ‘मालिकावीर’ पुरस्कार देखील देण्यात आला होता. आता ऑस्ट्रेलिया संघ पुढील मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! आज होणारा दुसरा टी२० सामना रद्द? भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
‘भज्जी’ची पत्नी गीता बसरानं दाखवली मुलाची पहिली झलक; नाव काय ठेवलंय माहितीये?
गोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’!