आयपीएल २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबाद संघाकडून फलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. परिणामी त्यांनी १२ धावांनी हा सामना गमावला. हैदराबादच्या जबड्यातून सामना ओढून आणण्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान याचाही मोठा हात राहिला. त्याने या सामन्यात हैदराबादच्या ४ फलंदाजांना बाद केले. यामध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याच्या विकेटचाही समावेश होता. सामन्यानंतर आवेशने विलियम्सनला बाद करण्यासाठी बनवलेल्या योजनेचा खुलासा केला आहे.
लखनऊच्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला ९ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावाच करता (SRH vs LSG) आल्या. या डावात लखनऊकडून आवेशने (Avesh Khan) ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यामध्ये विलियम्सन (Kane Williamson), अभिषेक शर्मा, निकोलस पूरन आणि अब्दुल समद अशा खेळाडूंचा समावेश होता.
विलियम्सनच्या विकेटबद्दल बोलताना आवेश (Avesh Khan On Kane Williamson Wicket) म्हणाला, “मला विलियम्सनला स्लोअर चेंडू जास्त फेकायचे होते. कारण आम्हाला वाटत होते की, चेंडू खेळपट्टीवर पकड घेत आणि थोडा थांबून येत आहे. योजना हीच होती की, त्याला अधिकाधिक डॉट चेंडू टाकायचे आणि यॉर्कर लेंथवर गोलंदाजी करायची.” आवेशची ही योजना संघाच्या कामीही आली. आवेशने हैदराबादच्या कर्णधाराला ऍँड्य्रू टायच्या हातून १६ धावांवर झेलबाद केले होते.
आवेशला त्याच्या सामन्यातील प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला की, “आयपीएलमध्ये गोलंदाज असल्याकारणाने आमच्यावर प्रत्येक सामन्यात दबाव असतो. परंतु आम्ही त्या दबावाला कसे सामोरे जातो, हे जास्त महत्त्वाचे असते. मी कधीही संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, असा विचार करत नाही. मी फक्त संघासाठी अधिकाधिक विकेट्स घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. जर मी असा विचार केला की, मी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. तर माझ्यावरील दबाव अजून जास्त वाढेल, म्हणून मी तसा विचार करत नाही.”
मागील सामन्यातील आपल्या चुकीबाबत बोलताना आवेश म्हणाला, “मला आनंद आहे की, संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो. पहिल्या सामन्यात मला ११ धावा वाचवण्याची संधी होती, परंतु मी त्यामध्ये अपयशी ठरलो होते. त्यामुळे आज मी विकेट घेण्यावर जास्त लक्ष दिले.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा