पॅरिस ऑलिम्पिकमधील 12 वा दिवस भारतासाठी फारच निराशाजनक होता. भारताला एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के मिळाले. सुवर्ण पदकाच्या आशेत असणाऱ्या भारतीयांची सकाळ धक्कादायक ठरली जेव्हा कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन जास्त असल्यामुळे स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले. यानंतर वेटलिफ्टिंग स्पर्धेतदेखील भारताच्या मीराबाई चानूचे पदकही यावेळी एका गुणाने हुकल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे 3000 मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम सामन्यात अविनाश 11 व्या स्थानावर राहीला आणि भारताच्या पदकाच्या आशा धुळीस मिळाल्या.
विनेश फोगाट, मीराबाईनंतर पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली. पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेसमध्येही भारताची निराशा झाली आहे. भारताचा अविनाश साबळे या शर्यतीत अकराव्या क्रमांकावर आहे. भारतीय स्टार खेळाडूनं 8:14.18 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. मोरोक्कोच्या सुफयान अल बक्कलीने 8:06.05 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलं. बक्कली सलग दुसऱ्यांदा हे सुवर्ण जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला.
29 वर्षीय भारतीय ॲथलीट अविनाश साबळे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिला आणि त्याचं पदक हुकलं. पॅरिस ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी सोमवारी, अविनाशनं पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पाचव्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती आणि इतिहास रचला होता. दरम्यान, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो भारतातील पहिला खेळाडू आहे. राष्ट्रीय विक्रम धारक साबळेनं दुसऱ्या हीटमध्ये 8 मिनिटं 15.43 च्या वेळेसह पाचवं स्थान पटकावलं होतं. तीन हीटमध्ये अव्वल 5-5 स्थानी राहिलेल्या धावपटूंना फायनलची तिकिटं मिळाली, त्याला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं भारताच्या आणखी एका पदकाची आशा मावळली.
हेही वाचा-
गोल्डन बाॅय नीरज चोप्रासह हाॅकी संघ मैदानात, पाहा पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे आजचे वेळापत्रक
मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!
सनथ जयसूर्या 27 वर्षांनंतरही ‘काळ’ बनला, सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्माचेही स्वप्न धूळीत