भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चेन्नई येथे नुकताच मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत भारताचा २२७ धावांनी पराभव केला. भारतीय संघात ऐनवेळी गोलंदाजी विभागात बदल करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या पहिल्या डावात विकेट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.
सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच अष्टपैलू अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला अंतिम अकराच्या संघात खेळता आले नाही. मात्र आता एक आशादायी बातमी समोर येत असून त्यानुसार अक्षर पटेलने नेट्स मध्ये सराव केला आहे व दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अंतिम अकरामध्ये खेळू शकतो.
अक्षर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त झाला, तर तो शाहबाज नदीमची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “अक्षरच्या हाताला सामान्य दुखापत झाली होती. त्याने यापूर्वीही नेटमध्ये सराव केलेला आहे. येणाऱ्या काही दिवसातच तो पूर्ण तंदुरुस्त झालेला असेल व गोलंदाजी करणे देखील सुरू करेल. पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर खेळणार हे जवळजवळ निश्चित होते. मात्र अंतिम संघाबद्दलचा निर्णय कर्णधार व कोचवरच असेल.”
सामना संपल्यानंतर विराटने देखील नदीमबद्दल मत मांडले होते. विराटने स्पष्ट केले की जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांनी निर्माण केलेला दबाव शाहबाज नदीम व वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजी करताना टिकवून ठेवता आला नाही. त्यामुळे अक्षर पटेलला नदीमच्या जागी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
नदीमने संपूर्ण सामन्यात ४ गडी बाद केले, मात्र तो फारच खर्चिक ठरला. त्याने ५९ षटकात २३३ धावा दिल्या. विशेष म्हणजे फिरकीपटू असून देखील नदीमने ९ नोबॉल टाकले. नदीमच्या या कामगिरीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात अक्षरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण