टी२० विश्वचषकातील ४१ वा सामना पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या होत्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघ ११७ धाव करू शकला. कर्णधार बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी सामन्यात अर्धशतके झळकावली. बाबर आझमने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत स्पर्धेत चौथे अर्धशतक साजरे केले.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने टी२० विश्वचषकात चौथ्यांदा पन्नासहुन अधिक धावा केल्या आहेत. याआधी अशी कामगिरी मॅथ्यू हेडनने २००७ च्या विश्वचषकात केली होती. त्यांनंतर विराट कोहलीने २०१४ सालच्या टी२० विश्वचषकात चार वेळा पन्नासहुन अधिक धावा केल्या होत्या.
बाबर आझमने कर्णधार म्हणून टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा पन्नासहुन अधिक धावा करण्याचा विक्रम देखील केला आहे. त्याने चौथ्यांदा कर्णधार म्हणून पन्नासहुन अधिक धावा केल्या आहेत
याशिवाय बाबत आझम विश्वचषक स्पर्धेत पदार्पणातच सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमापासून एक धाव दूर आहे. त्याने आतापर्यंत २६४ धावा केल्या आहेत. २००७ सालच्या टी२० विश्वचषकात मॅथ्यू हेडन याने २६५ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्याची सुरुवात अतिशय संथ झाली. मोहम्मद रिझवान १९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्याचा बळी हमजा ताहिरने घेतला. यानंतर फखर झमानही १३ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. पण बाबर आझमने दुसरे टोक लावून धरले. यानंतर चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या मोहम्मद हाफिजने येताच आक्रमक फलंदाजी केली. हाफिजने १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. बाबर आझमने सलग तिसरे आणि स्पर्धेतील चौथे अर्धशतक झळकावले. पाकिस्तान संघाने शेवटच्या षटकात स्कॉटलंडवर हल्ला चढवला. शोएब मलिकने अवघ्या १८ चेंडूत ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. पाकिस्तानने शेवटच्या पाच षटकांत एक गडी गमावून ७७ धावा केल्या.