टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तानने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) सलग तिसरा विजय नोंदवला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने सुपर-१२ टप्प्यातील तिसर्या सामन्यात अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या बाबर आझमने एक मोठा विक्रम केला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकात ६ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानने १९ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. ‘सामनावीर’ आसिफ अलीने डावाच्या १९व्या षटकात ४ षटकार ठोकले आणि पाकिस्तानचा विजय निश्चित केला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५१ धावांची खेळी खेळली. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये कर्णधार म्हणून बाबरची ५० हून अधिक धावांची खेळी करण्याची ही १३ वी वेळ होती.
त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. तो आता या यादीत विराट कोहली सोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोघांनीही १३ वेळा ५० हुन अधिक धावांची खेळी खेळली आहे.
या यादीत संयुक्तपणे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुसऱ्या स्थनावर आहेत. दोघांनीही ११ वेळा ५० हुन अधिक धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर इंग्लडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. त्याने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु फ्लेसीस याने ८ वेळा अशी कामगिरी बजावली आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या दोन षटकात पाकिस्तानला विजयासाठी २४ धावांची गरज होती. आसिफ अली खेळपट्टीवर होता आणि नबीने करीम जनातकडे चेंडू सोपवला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आसिफने सामन्यात अशी रंगत आणली की, याच षटकात त्याने संघाला विजय मिळवून दिला.
आसिफने १९ व्या षटकाच्या पहिला चेंडू लाँग ऑफवर टोलवत षटकार मिळवला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर डीप मिड विकेटवर षटकार ठोकला. आसिफनेही षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्याने ७ चेंडूत नाबाद २५ धावांची खेळी खेळली. तब्बल ३५७ च्या स्ट्राइक रेटने धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
महत्त्वाच्या बातम्या –






