पाकिस्तान क्रिकेट संघाने सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध विजय मिळवून आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत वेस्ट इंडिज संघाला १३० धावांवर रोखले आणि सहजपणे ७ विकेट्सने हा सामना आपल्या नावावर केला. कर्णधार बाबर आझमने शानदार अर्धशतक झळकावले पण त्याआधी त्याने क्षेत्ररक्षण करताना त्याचा सहकारी खेळाडू शादाब खानला जबरदस्त ट्रोल केले. आझमने त्याला म्हातारा म्हटल्याचा संवाद स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
अशी घडली घटना
सामन्याच्या पहिल्या षटकात, लेंडल सिमन्सने शाहीन शाह आफ्रिदीचा एक चेंडू टॅप केला आणि एकेरी धाव चोरण्यात यशस्वी झाला. पॉईंटच्या दिशेने उभा असलेला, शादाब खान वेगात धावला पण रनआऊट करण्यात अपयशी ठरला. या अयशस्वी प्रयत्नावर बाबर आझम संतापला आणि शादाब खानला म्हणाला, ‘ बूढ़ा हो गया है.. बूढ़ा हो गया है.. जवानी में ये रन आउट कर देता.’ त्याने आपल्या सहकारी खेळाडूला अशा प्रकारे ट्रोल केल्याने सोशल मीडियावर त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. शादाब खान पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याचा असा प्रयत्न पाहून कर्णधार नाराज झाला. म्हणून बाबरने मैदानावर शादाबला आपल्या शैलीत सुनावले.
"Budha hogaya hai"? 😂
Babar Azam to Shadab after a slow throw during practice match against WI today 😂😂#t20worldcup2021 #Pakistan #westindies pic.twitter.com/GIlcJz9ANk
— Munib Hamid (@MunibHamidpk) October 18, 2021
पाकिस्तानची सामन्यात सरशी
बाबर आझम आणि फखर झमानच्या शानदार खेळीमुळे पाकिस्तानने हा सामना ७ गडी राखून जिंकला. १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. फखर झमानसह बाबर आझमने ५८ धावांची भागीदारी करत सामन्यावर चांगली पकड बनवली. बाबर आझम ५० धावांवर बाद झाला आणि त्यानंतर लगेचच मोहम्मद हाफिज पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सलग दोन गडी बाद झाल्यानंतर फखर झमान आणि शोएब मलिक यांनी पाकिस्तानचा डाव हातात घेतला आणि संघाला विजय मिळवून दिला. फखर जमानने ४६ धावांची नाबाद खेळी खेळली.