संयुक्त अरब अमिरातीमध्ये यूएई) होत असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत जगभरातील बारा सर्वोत्तम संघ विजेतेपदासाठी झुंज देत आहेत. त्याच वेळी अनेक खेळाडू आपल्या वैयक्तिक कामगिरीने सर्वांना प्रभावित करतायेत. हा विश्वचषक सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने फलंदाजीत व श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा गोलंदाजीत प्रथमस्थानी आले आहेत.
बाबरला झाला शानदार फॉर्मचा फायदा
विश्वचषकात आत्तापर्यंत पाकिस्तान संघासाठी आपल्या नेतृत्वाने सर्वांना मोहित करणाऱ्या बाबर आझम याने आपल्या फलंदाजीने देखील पाकिस्तानच्या चारही विजयात मोलाची भूमिका पार पाडली. त्याने आत्तापर्यंत चार डावांमध्ये ६६ च्या शानदार सरासरीने व १२४.५२ च्या स्ट्राईक रेटने १९८ धावा काढल्या आहेत. यासह तो पुन्हा एकदा टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू असलेला इंग्लंडचा जोस बटलर याने ८ स्थानांची मोठी झेप घेत नववा क्रमांक पटकावला. तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच हा तिसऱ्या क्रमांकावर आला. भारतीय कर्णधार विराट कोहली पाचव्या व केएल राहुल आठव्या क्रमांकावर कायम आहेत.
हसरंगा गोलंदाजीत पहिला
या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सात सामन्यात चौदा बळी मिळवणारा श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए हा शानदार कामगिरीनंतर सातव्या क्रमांकावर विराजमान झाला. भुवनेश्वर कुमार टॉप २० मधील एकमेव भारतीय गोलंदाज असून तो १८ व्या स्थानावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत या स्पर्धेतून बाहेर झालेला बांगलादेशचा दिग्गज शाकिब अल हसन याला एका स्थानाचे नुकसान झाले व तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी पहिल्या तर, नामिबियाचा स्मीट तिसऱ्या क्रमांकावर आहे. वनिंदू हसरंगा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान झाला. भारताचा एकही अष्टपैलू पहिल्या वीसमध्ये सामील नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा या चेंडूवर बाद होणार’, रिझवानने केली भविष्यवाणी अन् खरंच फलंदाज झाला बाद, पाहा व्हिडिओ
कहर कामगिरी! टी२० सामन्यात ८ पेक्षा कमी चेंडू खेळूनही ‘मॅन ऑफ द मॅच’ बनणारे ३ फलंदाज
अफगाणिस्तानविरुद्ध रोहितची बॅट तळपली, तर टी२०च्या ‘या’ विक्रमात मारेल बाजी; बनेल केवळ दुसरा भारतीय






