आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला. यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. दरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्ध सामना पार पडल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी असे काही केले, जे पाहून बाबर आजमने स्वतः प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंती केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार पार पडणार होता. परंतु पहिला वनडे सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच ऐनवेळी न्यूझीलंड संघाने हा दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते. ज्यामुळे पाकिस्तान संघाचे चाहते, न्यूझीलंड संघातील खेळाडूंना ट्रोल करण्याची कुठलीही संधी गमावताना दिसून येत नाहीये. अशातच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू असताना पाकिस्तानी चाहते न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाहून ‘सेक्युरीटी.. सेक्युरीटी’ असे चिडवत होते. सामना झाल्यानंतर देखील त्यांचे हे चिडवणे सुरूच होते. त्यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम प्रेक्षकांजवळ गेला आणि त्यांना शांत राहण्याची विनंती केली. एकीकडे बाबर आजम किती मोठ्या मनाचा आहे याचे दर्शन घडले, तर दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
This Pakistan team has nailed the wholesome and professional thing.
Here's captain Babar Azam and vice-captain Shadab Khan asking the Pakistan crowd to tone down their "security" chants to New Zealand.#T20WorldCup pic.twitter.com/Is0YZzZ2HI
— Change of Pace (@ChangeofPace414) October 27, 2021
तसेच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने २७ आणि डेवोन कॉनवेने देखील २७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ३३ आणि आसिफ अलीने नाबाद २७ आणि शोएब मलिकने नाबाद २६ धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा ‘या’ पदावरुन राजीनामा, आयपीएलच्या २ नव्या संघांशी जोडलेले आहे प्रकरण
वाचला ना गडी! पत्नीचा वाढदिवस विसरणे हाफिजला पडले असते महागात; सानियाने केली ‘अशी’ मदत






