पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अखेरचा सामना जिंकून पाकिस्तानने २-१ असा मालिका विजय साजरा केला. याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात इतिहास रचला आहे. टी२० मध्ये बाबरने आपल्या दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा विक्रमही मोडला.
बाबरच्या नावे जमा हा विक्रम
झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात बाबरने ५२ धावांची खेळी करताना आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात वेगवान २००० धावा बनवणारा फलंदाज बनला. बाबरने ५२ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याने या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.
विराटने ६० सामन्यांच्या ५६ डावांमध्ये २००० धावांचा पल्ला पूर्ण केला होता. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच असून फिंचने ६२ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
पाकिस्तानचा मालिका विजय
मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानी प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या ९१ व कर्णधार बाबर आझमच्या ५२ धावांच्या जोरावर १६५ धावा धावफलकावर लावल्या.
प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तानच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर केवळ १४१ धावा बनवू शकला. झिम्बाब्वेने मालिकेतील पहिला सामना जिंकत खळबळ उडवली होती. सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार मोहम्मद रिझवानने आपल्या नावे केले.
बाबर आझमची टी२० कारकिर्द
पाकिस्तानचा कर्णधार असलेला बाबर आझम आत्तापर्यंत आपल्या टी२० कारकिर्दीत ५४ सामने खेळला असून त्याच्या ५२ डावांमध्ये त्याने आत्तापर्यंत ४७.३० च्या सरासरीने २०३५ धावा बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आता राष्ट्रकुल स्पर्धेत रंगणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, ‘या’ ७ संघांनी मिळवली पात्रता
दुसर्या संघांकडून आता लोनवर खेळाडू घेणार राजस्थानचा संघ, वाचा कोणत्या नियमाचा होणार फायदा
भारतीय ड्रेसिंग रूममध्ये ‘या’ नावाने जडेजाला मारली जाते हाक, खुद्द शास्त्री गुरूजींनी केला उलगडा






