येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आशिया चषक २०२२ खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील दुसराच सामना कट्टर प्रतिद्वंद्वी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. दुबई येथे होणाऱ्या या सामन्यावर संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागून आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम चर्चेत आला आहे. पाकिस्तानच्या नेदरलँड दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावरून आझम भडकला.
आझम (Babar Azam) हा केवळ पाकिस्तानचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जाते. तो नुकताच वनडे आणि टी२० क्रिकेटमधील नंबर १ (आयसीसी क्रमवारीत) फलंदाज बनला आहे. तसेच कसोटी क्रमवारीतही तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो वर्तमानातील एकमेव असा फलंदाज आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात पहिल्या ३ फलंदाजांमध्ये आहे.
परंतु जुलैमध्ये झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आझमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २४६ धावांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. याच पराभवावरून काही पत्रकारांनी पाकिस्तानी कर्णधारावर निशाना साधला आहे.
मुलाखतीदरम्यान एका पत्रकाराने आझमला प्रश्न विचारला की, “तू क्रिकेटमधील एखाद्या स्वरूपातून (Babar Azam Retirment) निवृत्त होण्याचा विचार करत आहेस का? या निर्णयामुळे मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांसारख्या खेळाडूंना फायदा होईल का? पत्रकाराच्या या प्रश्नावर आझमने दिलेले उत्तर चर्चेत आहे.”
आझम म्हणाला (Babar Azam Reply To Journalist) की, “हे तुमच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते. सध्या ज्या प्रकारची माजी तंदुरुस्ती आहे, त्यावरून मी असा विचार केलेला नाहीये की, मी एखाद्या क्रिकेट स्वरूपाला सोडून फक्त दोनच स्वरूपात खेळावे. तुम्हाला काय वाटते, मी म्हातारा झालो आहे का. किंवा आम्ही सगळे म्हातारे झालो आहेत. मला नाही वाटत की, माझ्यावर जास्त दबाव पडत आहे. जर माझ्यावरील दबाव वाढला, तर त्यानुसार मी माझ्या तंदुरुस्तीतही वाढ करेल.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा