पाकिस्तान क्रिकेटमध्ये सततच उलथापालथ सुरू असते. कधी पीसीबीचे अध्यक्ष बदलले जातात, कधी निवड समितीत बदल होतो, तर कधी कर्णधार बदलल्या जातो.
आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, लवकरच पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारात बदल होऊ शकतो. बाबर आझमला पुन्हा या पदावरून हटवलं जाऊ शकतं. बाबरची जागा घेण्याच्या शर्यतीत यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचं नाव आघाडीवर आहे.
वास्तविक, 12 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स एकदिवसीय चषक होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच देशांतर्गत स्तरावर खेळणारे खेळाडूही सहभागी होतील. या स्पर्धेत एकूण पाच संघ भाग घेणार असून संघांच्या कर्णधारांचीही घोषणा झाली आहे. मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, मोहम्मद हरीस आणि सौद शकील हे 5 कर्णधार आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, स्टार फलंदाज बाबर आझमला कोणत्याही संघाचा कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. त्यामुळेच बाबरला लवकरच पाकिस्तानच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
पाकिस्तानला या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानला एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या मर्यादित षटकांचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी याबाबत दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बाबर आझम यांच्याशी चर्चा केली होती, असंही रिपोर्टमध्ये म्हटलंय.
जर सर्व काही सुरळीत झालं, तर भविष्यात मोहम्मद रिझवानकडे पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. रिझवाननं अद्याप पाकिस्तान संघाचं कर्णधारपद भूषवलेलं नाही. मात्र त्यानं पीएसएलमध्ये नेतृत्व केलं आहे.
गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमनं सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काही महिन्यांनंतर टी20 विश्वचषकापूर्वी त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आलं. पण त्याच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब राहिली. पाकिस्तानला विश्वचषकाच्या सुपर 8 मध्येही पोहोचता आलं नाही. तेव्हापासून त्याच्यावर बरीच टीका होत आहे.
हेही वाचा –
“टायगर अभी जिंदा है…”, UP T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारची खतरनाक गोलंदाजी, फलंदाजांना काहीच सुचेना!
इंग्लंडच्या कर्णधाराचं अनोखं शतक, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असं प्रथमच घडलं!
ऑलिम्पिकमध्ये दुष्काळ….तर पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव! भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमागचं कारण काय?